क्यार वादळामुळे किनारपट्टी हादरली; भातशेतीचे मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 11:51 AM2019-10-26T11:51:11+5:302019-10-26T11:51:28+5:30

‘क्यार’ वादळाचा कोकण किनारपट्टीला मोठा फटका बसला आहे.

kyarr cyclone comes in konkan region | क्यार वादळामुळे किनारपट्टी हादरली; भातशेतीचे मोठे नुकसान

क्यार वादळामुळे किनारपट्टी हादरली; भातशेतीचे मोठे नुकसान

Next

सिंधुदुर्ग : ‘क्यार’ वादळाचा कोकण किनारपट्टीला मोठा फटका बसला आहे. किनारपट्टी भागात दर्याला उधाण आलं आहे. त्यामुळे किनारपट्टीलगतच्या घरामध्ये पाणी शिरलं आहे. तर गेल्या तीन ते चार दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे भातशेतीचे मोठं नुकसान झालं आहे. तर किनारपट्टी भागात समुद्राच्या उधाणाचे पाणी लगतच्या वस्तीत गेल्याने त्याठिकाणचे ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे तळकोकणात दोडामार्ग, वेंगुर्ले, मालवण, कुडाळ, सावंतवाडी, कणकवलीत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस  पडतं आहे. कमी दाबाच्या पट्यामुळे पुढील २४ तास असाच पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

किनारपट्टीच्या भागात समुद्राच्या उधाणाचा फटका आचरा पिरावाडी, जामडूल बेटाला देखील बसला.  खाडी किनारपट्टी लगतच्या घरांमध्ये शिरल्याने घरातील अन्न धान्यासहीत इलेक्ट्रॉनिक वस्तू भिजून गेल्याने ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहेत. पिण्याच्या पाण्याच्या विहिरीतही पाणी शिरल्याने पिण्याचे पाणी देखील दूषित झालंय, तर काही मच्छिमारांच्या जाळीचेही नुकसान झाले. पुढील दोन दिवस उधाणाचा धोका कायम असल्याने जामडूल बेटावरील ग्रामस्थ भितीच्या छायेखाली आहेत. मालवण, आचरा, देवगड भागाला समुद्राच्या उधाणाचा फटका. आचरा जामडूल पिरावाडीला उधाणाचा फटका जामडूल बेटाला पाण्याचा विळखा, खाडी किनारपट्टी लगतच्या घरामध्ये पाणी शिरले आहे.

मालवण तालुक्यातील बागायत येथील पुलावरून पुराचे पाणी जात असल्याने मालवणकडून कणकवलीकडे जाणारी वाहतूक गेले सहा तास पूर्णपणे ठप्प आहे. केरळ, तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक राज्यातील अनेक बोटी आश्रयासाठी कोकणातील सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या देवगड बंदरात आणल्या आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व बोटी देवगडमध्ये दाखल झाल्या आहेत. 'क्यार' चक्रीवादळचा फटका मासेमारी व्यवसायाला आणि पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. तसेच सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे दोडामार्ग तालुक्यात सर्व नदी-नाले तुडूंब भरले आहेत. तिलारी धरणातही क्षमतेपेक्षा जास्त साठा झाला आहे. भेडशी येथील नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने येथील कॉजवे पाण्याखाली गेल्याने ग्रामीण भागातील वाहतूक ठप्प झाली आहे.

Web Title: kyarr cyclone comes in konkan region

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.