कुडाळ -वैभव नाईक ठरले जायंट किलर
By Admin | Updated: October 19, 2014 22:59 IST2014-10-19T21:26:27+5:302014-10-19T22:59:17+5:30
राज्याचे लक्ष--कुडाळ विधानसभा मतदारसंघा- कॉँग्रेसचे राज्याचे प्रचारप्रमुख नारायण राणे यांचा शिवसेनेचे १०३७६ मतांनी मोठा पराभव केला

कुडाळ -वैभव नाईक ठरले जायंट किलर
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कुडाळ विधानसभा मतदारसंघामधून कॉँग्रेसचे राज्याचे प्रचारप्रमुख नारायण राणे यांचा शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यांनी १०३७६ मतांनी मोठा पराभव केला असून नारायण राणे यांचा गेल्या २५ वर्षांतील पहिलाच पराभव आहे. हा पराभव म्हणजे कोकणातील कॉँग्रेसला मोठा धक्का आहे.
नव्याने निर्माण झालेल्या कुडाळ-मालवण मतदारसंघाचे पहिले आमदार म्हणून नारायण राणे हे २००९ साली वैभव नाईक यांचाच सुमारे २४ हजार मतांनी पराभव करून विजयी झाले होते. या मतदारसंघाची ही दुसरी निवडणूक व ही निवडणूक लढवावी का नको या विचारात नारायण राणे होते. परंतु ऐन अर्ज भरण्याच्या दोन दिवसांपूर्वी त्यांनी आपण याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे जाहीर केले. लोकसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघाने भाजप शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांना २१ हजाराचे मताधिक्य दिले होते. सुरूवातीपासूनच या मतदारसंघातील कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत वाद, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव, लोकसभेमधील पराभवामुळे कॉँगे्रेस कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ तसेच काही महिन्यांपूर्वी कॉँग्रेसच्या पक्षश्रेष्ठी तसेच काही पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून या तालुक्यातील कॉँग्रेसच्याच काही प्रमुख पदाधिकाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात व्यक्तीगत टीका करण्यात आली होती. त्यामुळे या ठिकाणी बरेचसे कार्यकर्ते नाराज होते. तसेच गावपातळीवर नारायण राणे यांनी विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला होता. मात्र, त्यांच्याच काही कार्यकर्त्यांकडून गावपातळीवर कामे करण्यात आली. मात्र, या कामांचा दर्जा राखण्यात त्यांना अपयश आले. त्यामुळे जनतेचा रोष ओढवून घेतला. अशा कारणांमुळे मोठ्या प्रमाणातील नाराजी मताधिक्य कॉँग्रेसच्या बाजूने राहिले नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या मतदारसंघातील कुडाळ मालवण तालुक्यांत टाळंबा, वनसंज्ञा, आकारीपड, हत्तींकडून नुकसानी, मच्छिमारांचे प्रश्न, एमआयडीसी, सीवर्ल्ड तसेच इतर प्रकल्पग्रस्त, स्थानिक यांच्या न सुटलेल्या प्रश्नांची येथील कॉँग्रेस पक्षाने गांभीर्याने दखल घेतली नाही. यामुळेही जनतेने विरोधात कौल दिला.
गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव होऊनही या मतदारसंघात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असलेले वैभव नाईक ठाण मांडून बसले होते. त्यांनी पाच वर्षांच्या कालावधीत खासदार विनायक राऊत यांच्या मदतीने मतदारसंघातील शिवसेना वाढीकडे लक्ष दिले. वैभव नाईक हे पक्षसंघटना वाढवत आहेत. याकडे मात्र, कॉँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी पूर्ण दुर्लक्ष केले.
वैभव नाईक यांनी शिवसेना वाढवण्यासाठी दांडगा लोकसंपर्क निर्माण केला. निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात गावनिहाय दौरे काढत ‘गाव तिथे शाखा’ हा शिवसेनेचा उपक्रम जोमाने राबवित संघटना मजबूत केली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर कॉँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते गावांमध्ये पोहोचण्याची घाई करू लागले. परंतु, अगोदरपासूनच संपर्क न ठेवल्याने गावांमध्ये त्यांना निवडणुकीच्या काळात योग्यप्रकारे पोहोचता आले नाही.
एकेठिकाणी युती व आघाडी तुटल्याचा फायदा कॉँगे्रसलाच होईल व नारायण राणे सहज निवडून येतील, या भ्रमात कॉँग्रेस पदाधिकारी राहिले. मात्र, हा त्यांचा भ्रमच राहिला. कारण या निवडणुकीचा निकाल पाहता जरी युती आघाडी तुटली असली तरी राष्ट्रवादी व भाजपाने मोठ्या प्रमाणात शिवसेनेला साथ दिली, हे स्पष्ट होते.
दुसऱ्या बाजूने वैभव नाईक यांचा विचार करता या मतदारसंघातील जनतेच्या विविध समस्या, प्रश्न, प्रसंगावेळी वैभव नाईक धावून गेले. वेळप्रसंगी जनतेसाठी रस्त्यावर उतरले. या मतदारसंघात नाराज असलेल्या राणे समर्थकांशी नाईक यांनी गाठीभेटी घेत त्यांना आपलेसे केले.
आकडेवारीवरून असे दिसते की पाच वर्षांपूर्वीच्या निवडणुकीत वैभव नाईक यांना पडलेली ही मते यांमध्ये बऱ्याचशा नाराजांची मते होती. त्यावेळी नारायण राणे यांना सुमारे २४ हजारांचे मताधिक्य होते. आताच्या निवडणुकीत नाईक दहा हजारांच्या मताधिक्याने निवडून आले. म्हणजेच राणेंचे त्यावेळचे २४ हजारांचे मताधिक्य कापत नाईक यांनी हा विजय मिळवला आहे. नाराजांची संख्या राणे कमी करू शकले नाहीत, हे यावरून स्पष्ट होते.
तुटलेल्या युतीचा विचार वैभव नाईक यांनी तातडीने करत भाजपाचे छुपे सहकार्य कसे मिळवता येईल याकडे पूर्ण लक्ष दिले होते. भाजपाने दिलेला उमेदवारही नामधारी होता, असे म्हणावे लागेल. या मतदारसंघात भाजपाचे नेटवर्क कमी आहे. उलट राष्ट्रवादी कॉँग्रेसने दिलेले उमेदवार पुष्पसेन सावंत हे तब्बल ४० पेक्षा जास्त वर्षे राजकारणात आहेत. तसेच दोन वेळा ते आमदारही झाले होते. मात्र, पुष्पसेन सावंत हे कायम राणेंच्या विरोधात राहत त्यांनी टीका केली. लोकसभा निवडणुकीत तर त्यांनी त्यांच्या पूर्णपणे विरोधात काम केले. यावेळी मात्र त्यांनी स्वतंत्र राष्ट्रवादीच्या तिकीटावर उडी घेतली. मात्र, मतदानाच्या आधी एक दिवस नीलेश राणे यांची भेट घेतल्याची चर्चा मतदारसंघात फिरली. त्यामुळे धरसोड वृत्तीला राष्ट्रवादीच्या मतदारांनी नाकारल्याचे दिसून आले. ही मते पूर्णपणे शिवसेनेकडे वळल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
शिवसेना प्रचार यंत्रणेत आघाडीवर
कुडाळ मतदारसंघातून वैभव नाईक हेच उमेदवार म्हणून असणार हे निश्चितच होते. त्यामुळे प्रचारात नाईक यांनी आधीपासून आघाडी घेतली होती. कणकवलीत राहूनही त्यांनी कुडाळ, मालवणमध्ये आपले लक्ष केंद्रीत केले होते. युवा पिढीला आपल्याकडे आकर्षित करून त्यांच्या हाती प्रचाराची धुरा दिली. खासदार म्हणून विनायक राऊत निवडून आल्यानंतर मतदारसंघात त्यांच्या प्रभावाचा पूर्णपणे वापर केला. नारायण राणे यांचा पराभव हे शिवसेनेचे हे मोठे स्वप्न होते. त्यामुळे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे वैभव नाईक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. वेळोवेळी नाईक यांच्यासाठी सिंधुदुर्गात आले. शिवसैनिकांना वैभव नाईक यांच्या रूपाने नेतृत्व मिळाले.
उमेदवारपक्षमिळालेली मते
२नारायण राणे कॉँग्रेस६०२०६
३विष्णू मोंडकरभाजप४८१९
४पुष्पसेन सावंतराष्ट्रवादी२६९२
५रविंद्र कसालकरबसपा१०७१
६स्नेहा केरकरअपक्ष७४७
(वैभव नाईक १०,३७६ मताधिक्याने विजयी)
शिवसेनाप्रमुखांना श्रद्धांजली - वैभव नाईक
कुडाळ मतदारसंघातील शिवसेनेचा विजय हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना खरी श्रद्धांजली आहे. वाईट प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही दिलेल्या लढ्याचा हा परिणाम असून या विजयासाठी पक्षश्रेष्ठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले. त्यामुळे हा विजय संपादन करता आला. या विजयाने आपली जबाबदारी वाढली असून पाय जमिनीवर ठेवून जनतेच्या विकासासाठीच आपला नेहमी प्रयत्न राहील. जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांनी आणि युवा शिवसैनिकांनी माझ्या विजयासाठी दिवस-रात्र एक करून काम केले, हा आनंद आज शिवसैनिकांच्या डोळ््यात पहायला मिळाला.
पराभव झाला हे मी मान्य करतो : नारायण राणे
कोकणी माणसाने मला राजकारणात बरेच काही दिले आणि त्यांनीच पहिला पराभव दाखविला. विधानसभा निवडणुकीत माझा पराभव झाला हे मी स्वीकारतो. जनतेचा कौल मला मान्य आहे. माझ्या पराभवाने महाराष्ट्राच्या राजकारणातून काहीतरी गमावले आहे. असे राज्यातील जनतेला निश्चितच वाटेल.
जनतेचा कौल मान्य : विष्णू मोंडकर
येथील जनतेने दिलेला कौल आपणास मान्य असून आपण तो स्वीकारला आहे. जरी आपला पराभव झाला असला तरी राज्यात भाजपाला मोठे यश मिळाले असून विकासाची मोठी संधी चालून आली आहे. केंद्र व राज्यात भाजप सरकार आल्याने विकासाची प्रक्रिया गतिमान होईल.