कोकण रेल्वेमार्ग असुरक्षितच!
By Admin | Updated: November 5, 2014 23:38 IST2014-11-05T22:43:39+5:302014-11-05T23:38:20+5:30
सुभाष मळगी : गाड्यांचा वेग तासी ७२ किलोमीटरपर्यंत मर्यादित

कोकण रेल्वेमार्ग असुरक्षितच!
रत्नागिरी : व्यवस्थापनाने दुर्लक्ष केल्यामुळेच कोकण रेल्वेवरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे जीवन धोक्यात आले आहे. रुळांची दुरुस्ती व अन्य काम परिपूर्ण होईपर्यंत कोकण रेल्वेवरील सर्व गाड्या तासी ७५ किलोमीटर वेगानेच धावतील. त्यापेक्षा अधिक वेगाला परवानगी नाही. दुरुस्तीचे काम पूर्ण केल्यानंतर व त्याची खात्री पटवून दिल्यानंतरच मार्गावरील गाड्यांचा वेग वाढवण्याची परवानगी दिली जाईल, असे स्पष्ट आदेश २० आॅक्टोबरलाच कमिशनर फॉर रेल्वे सेफ्टीने (सीआरएस) दिल्यामुळे कोकण रेल्वे मार्गाची दुरुस्ती सुरु झाली आहे. या आदेशामुळेच व्यवस्थापनाची झोप उडाली, असे प्रतिपादन कोकण रेल्वे एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष सुभाष मळगी यांनी पत्रकार परिषदेत केले.
गेल्या पंधरा वर्षांच्या काळात कोकण रेल्वेच्या रुळांची दुरुस्ती झाली नाही, हे वास्तव आहे. त्यासाठी सुरुवातीच्या काळात रुळांचे अल्ट्रासोनिक स्कॅनिंग करण्यासाठी चार कर्मचाऱ्यांना लखनौ येथे प्रशिक्षण देण्यात आले होते. तीन वर्षे त्यांनी हे काम केले. त्यानंतर त्यापैकी तीन कर्मचाऱ्यांना पुन्हा रिफ्रेशर कोर्ससाठी पाठविले गेले नाही. केवळ अल्ट्रासोनिक स्कॅनिंग करु शकण्याचा अधिकार असलेला एकच कर्मचारी कोकण रेल्वेकडे उपलब्ध असून, सध्या तो कोकण रेल्वेच्या रुळाचे स्कॅनिंग करण्यात गुंतला आहे. एकटा कर्मचारी हे काम कसे आणि किती काळात करणार हाच प्रश्न आहे. याशिवाय कोकण रेल्वे मार्गावर अपघात झाला की कामगारांना जबाबदार धरले जाते. अधिकारी नामानिराळे राहतात. मात्र, कामगारांना आवश्यक साहित्य देणार कोण? हा प्रश्नही आहे. त्यामुळे कमिशनर फॉर रेल्वे सेफ्टीने हे सर्व विषय गंभीरपणे घेतले आहेत, असे मळगी म्हणाले. ते म्हणाले, कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तिवेतन योजना राबविण्याच्या मागणीनुसार सामंजस्य करार झाला. भारतीय जीवन बिमा निगमकडे पेन्शन फंड दर महिन्याला १६ टक्के भरण्याचे रेल्वे व्यवस्थापनाने मान्य केले. एलआयसीकडे पॉलिसी करुन पैसे भरण्याची कार्यवाही सुरु झाली. २००६मध्ये मात्र कर्मचाऱ्यांना न सांगता पेन्शन फंडचे पैसे इपीएफला दिले. हे चुकीचे आहे. त्यामुळे या चुकीची दुरुस्ती करण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्यानंतर चुकीची तत्काळ दुरुस्ती करावी, असा आदेश न्यायालयाने दिला व कोकण रेल्वे ही भारतीय रेल्वेच आहे, असेही स्पष्ट केले. तरीही गेल्या काही वर्षात १८९ कोटींचा पेन्शन फंड कोकण रेल्वेने भरलेला नाही. याबाबत माहिती विचारली असता आम्ही तोट्यात आहोत, असे सांगितले गेले. तोटा झाला, असे तायल म्हणतात, तर कर्मचाऱ्यांना घरे देण्याच्या योजनेसाठी २७ कोटी कसे काय देऊ केले, असा सवालही त्यांनी केला. (प्रतिनिधी)
सुभाष मळगी उवाच...
कोकण रेल्वेचे सध्याचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक भानूप्रकाश तायल यांना कोकण रेल्वेच्या व्यवस्थेपेक्षा अन्य योजनांमध्येच जास्त स्वारस्य आहे. भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे कोकण रेल्वेत झालेली असून, त्यामागे तायल आणि त्यांचे रॅकेट असल्याचा घणाघाती आरोपीही मळगी यांनी केला आहे. मनमानी कारभाराचे अनेक प्रकार असून, त्यामुळे विद्यमान चेअरमनवर फौजदारी गुन्हे दाखल होऊ शकतात.
कोकण रेल्वेमध्ये केआरसी युनियन अधिकृत झाल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये असलेले भीतीचे वातावरण दूर झाले आहे. प्रमोशनचे बंद दरवाजे उघडले आहेत. व्यवस्थापनातील गैरकारभार रोखण्यासाठी युनियनने दंड थोपटले आहेत. त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत. निवडणुका नोव्हेंबर डिसेंबर होतील. परंतु व्यवस्थापनातील गैरकाराविरुद्ध उचललेले पाऊल मागे घेतले जाणार नाही, प्रसंगी तीव्र आंदोलन छेडले जाईल.
दुरुस्ती वेगात सुरु
कमिशनर फॉर रेल्वे सेफ्टीने (सीआरएस) दिल्यामुळे कोकण रेल्वे मार्गाची दुरुस्ती सुरु.
आदेशामुळेच व्यवस्थापनाची झोप उडाल्याचा मळगींचा आरोप.
गेल्या पंधरा वर्षांच्या काळात कोकण रेल्वेच्या रुळांची दुरुस्ती झाली नसल्याचा आरोप.
अल्ट्रासोनिक स्कॅनिंग करु शकण्याचा अधिकार असलेला एकच कर्मचारी कोकण रेल्वेकडे उपलब्ध.