Karnataka hit 1,500 farmers, paddy fields were finally completed | क्यारचा ६८ हजार १७४ शेतकऱ्यांना फटका, भातपिक क्षेत्राचे पंचनामे अखेर पूर्ण
क्यारचा ६८ हजार १७४ शेतकऱ्यांना फटका, भातपिक क्षेत्राचे पंचनामे अखेर पूर्ण

ठळक मुद्देक्यारचा ६८ हजार १७४ शेतकऱ्यांना फटका, भातपिक क्षेत्राचे पंचनामे अखेर पूर्णअंतिम अहवाल शासनाकडे पाठविला; जिल्ह्यातील नुकसानीचा आकडा मात्र घटला

सिंधुदुर्गनगरी : क्यार वादळाने पडलेल्या पावसामुळे बाधित झालेल्या भातपिक क्षेत्राचे अखेर पंचनामे पूर्ण झाले आहेत. पंचनामे पूर्ण करून त्याचा अंतिम अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ३० हजार १५ हेक्टर ६४ गुंठ्याचे पंचनामे करण्यात आले असून यामुळे ६८ हजार १७४ शेतकरी बाधित झाले आहेत.

भातशेती नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असेल तरी ६ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण झालेल्या क्षेत्राचे नुकसान १३८ कोटींच्यावर गेले होते. मात्र, आता बाधित क्षेत्र वाढलेली असताना नुकसानीचा आकडा मात्र घटला आहे. हा आकडा १२४ कोटी ७८ लाख ६८ हजार रूपयांवर आला आहे.

क्यार वादळामुळे कोसळलेल्या पावसाने जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या भातपिकाचे पूर्णत: नुकसान झाले होते. त्यामुळे येथील भातशेतीचे तत्काळ पंचनामे करावेत. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसानी शेतकऱ्यांना द्यावी.

भातशेतीसाठी शेतकऱ्यांनी २०१९-२० मध्ये घेतलेले ८० कोटींचे कर्ज माफ करावे, अशी मागणी जिल्ह्यातील राजकीय व्यक्ती, शेतकरी व सामाजिक संस्था यांनी उचलून धरली होती. त्यानंतर राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शालेय शिक्षण मंत्री आशीष शेलार यांना पाहणीसाठी पाठविले होते. शिवसेना पक्षाचे युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनीही जिल्ह्यात येत नुकसानीची पाहणी केली.

यावेळी दोघांनीही शेतकऱ्यांना सर्व नुकसानी मिळेल, असा विश्वास दिला होता. त्यादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यात हंगामी शेती नुकसानीसाठी १० हजार कोटींची रक्कम जाहीर करीत ६ नोव्हेंबरपर्यंत सर्व पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. सिंधुदुर्गात मात्र पंचनामे करणारी यंत्रणा तोकडी असल्याने ७ नोव्हेंबर ही तारीख पंचनामे पूर्ण करण्यास उजाडली.

उभ्या भातपिकाचे सर्वाधिक नुकसान

जिल्ह्यात २०१९-२० या हंगामी कालावधीत भातशेतीखाली ५७ हजार ३२३ हेक्टर क्षेत्र आले होते. आॅक्टोबरात लागलेल्या पावसाने यातील २९ हजार ६८७ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून ६२ हजार १२५ शेतकरी बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल राज्य शासनाला कृषी अधीक्षक कार्यालयाने पाठविला होता. यातील ७ नोव्हेंबरपर्यंत ३० हजार १५ हेक्टर ६४ गुंठे क्षेत्राचे पंचनामे पूर्ण केले आहेत. यात ६८ हजार १७४ शेतकरी बाधित झाले आहेत.

या पंचनाम्यामध्ये काढणी पश्चात भातपिकाचे ५ हजार ६ हेक्टर ७३ गुंठे क्षेत्राचे नुकसान झाले आहे. १४ हजार ७०५ शेतकरी बाधित झाले आहेत. मात्र, उभ्या पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. २५ हजार ८ हेक्टर ९८ गुंठे क्षेत्राचे हे नुकसान असून तब्बल ५३ हजार ४६९ शेतकरी बाधित झाले आहेत.

Web Title: Karnataka hit 1,500 farmers, paddy fields were finally completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.