Sindhudurg: वीज समस्येवरून कलमठ ग्रामस्थांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव!, कनिष्ठ अभियंता व ग्रामस्थांमध्ये बाचाबाची

By सुधीर राणे | Updated: May 22, 2025 15:49 IST2025-05-22T15:48:27+5:302025-05-22T15:49:21+5:30

आठ दिवसात कामे मार्गी लावण्याचे उपकार्यकारी अभियंत्यांचे आश्वासन

Kalmath villagers surround Mahavitaran officials over electricity problem | Sindhudurg: वीज समस्येवरून कलमठ ग्रामस्थांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव!, कनिष्ठ अभियंता व ग्रामस्थांमध्ये बाचाबाची

Sindhudurg: वीज समस्येवरून कलमठ ग्रामस्थांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव!, कनिष्ठ अभियंता व ग्रामस्थांमध्ये बाचाबाची

कणकवली: कलमठमधील वीज समस्यांवरून ग्रामस्थ आज, गुरुवारी आक्रमक झाले. कणकवली येथील कार्यालयावर धडक देत महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून त्यांना जाब विचारण्यात आला. कनिष्ठ अभियंता बोंगाळे यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराज असलेल्या संतप्त ग्रामस्थांनी त्यांना धारेवर धरले. अखेर उपकार्यकारी अभियंता विलास बगडे यांनी आठवडाभरात प्रलंबित कामे पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले. 

कलमठ गावातील विजे बाबतच्या विविध समस्यांबाबत सरपंच संदीप मेस्त्री यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली. उपकार्यकारी अभियंता विलास बगडे यांच्यासोबत चर्चा करताना कनिष्ठ अभियंता बोंगाळे यांना बोलावण्याची मागणी करण्यात आली. बोंगाळे येताच ग्रामस्थांनी त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. वीज समस्यांबाबत फोन लावला तरीही ते घेत नाहीत. ग्रामस्थांना योग्य उत्तर देत नाहीत. याबाबत आक्रमक ग्रामस्थांनी त्यांना धारेवर धरले. यावेळी बोंगाळे व ग्रामस्थांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. 

यावेळी बगडे यांनी कनिष्ठ अभियंत्यांना नागरिकांशी सौजन्य पूर्ण वागण्याबाबत सूचना दिल्या. यावेळी बोंगाळेंनी यापुढे जी कामे सांगितली जातील ती लेखी द्यावी. तोंडी कामे करणार नाही असे सांगताच आक्रमक ग्रामस्थांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. 

दरम्यान, बगडे यांनी कलमठ मधील वीज समस्या तातडीने सोडवण्याच्या दृष्टीने आपण कार्यवाही करतो असे आश्वासन दिले. त्यानुसार प्रलंबित कामांची यादी तयार करण्यात आली. यात बोंगाळे यांच्या कार्यपद्धतीमुळे कामावर हजर न होणाऱ्या रामू सांगवेकर यांना तातडीने हजर करून घेणे तसेच अन्य कामे प्राधान्याने आठ दिवसात करण्यात येतील असे आश्वासन यावेळी बगडे यांनी दिले. यावेळी सरपंच संदिप मेस्त्री, महेश लाड, निसार शेख, नितीन पवार, अनुप वारंग, पपू यादव, श्रेयस चिंदरकर, दिनेश गोठणकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांची भेट घेणार!

कलमठ गाव अर्बनला जोडण्यात यावा. कनिष्ठ अभियंता बोंगळे अकार्यक्षम आहेत.विजेच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी मार्ग काढावा. तीन दिवस सातत्याने वीज पुरवठा खंडित  होणे, म्हणजे महावितरण पाहिल्याच पावसात नापास झाल्यासारखे आहे. कलमठ वीज प्रश्नी कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेण्यात येईल. असे यावेळी संदीप मेस्त्री यांनी सांगितले.

Web Title: Kalmath villagers surround Mahavitaran officials over electricity problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.