जाखडी नृत्यही आता ‘प्रेझेंटेबल’ होतेय

By Admin | Updated: August 19, 2014 23:48 IST2014-08-19T22:54:06+5:302014-08-19T23:48:47+5:30

गणेशोत्सवाचे वेध : आता लोककलेमध्ये आधुनिकता

Jakhadi dance is now 'presentable' | जाखडी नृत्यही आता ‘प्रेझेंटेबल’ होतेय

जाखडी नृत्यही आता ‘प्रेझेंटेबल’ होतेय

कुवे : श्रावण बाळ जातो काशीला... या चालीवरच्या जाखडीचे सूर घुमले की, कोकणाला गौरी गणपतीची वर्दी मिळते. जाखडीची ही परंपरा आजही गणेशोत्सवात पाहायला मिळत आहे. जाखडीची ही परंपरा बदलली असली तरी अलीकडे आधुनिक व प्रेझेंटेबल जाखडीचे नाच आल्याने पूर्वी बाल्या नाच म्हणून हिणवलं जाणाऱ्या या लोककलेला या उत्सवात मात्र मानाचे स्थान मिळाले आहे.
शाहिरी, नमन, भारुड, तमाशा, दशावतार, खेळे ही कोकणी लोकसंस्कृतीची अंग आहेत. कोकणात वेगवेगळी निमित्त साधून या लोककला सादर होताना पाहायला मिळतात. गौरी गणपती आले की, मात्र कोकणी माणूस गौरी गणपतीचा नाच म्हणून रुढ असलेल्या जाखडी नृत्यात देहभान हरपून रमतो. हातात रुमाल, पायात चाळ बांधून ढोलकीच्या तालावर केल्या जाणाऱ्या लयबद्ध पदन्यासाला उच्चभ्रू बाल्या नाच म्हणून हिणवतात. मात्र, आजकाल याच जाखडी नृत्याने नवनवे बदल स्वीकारले. आधुनिक रुपडं मिळवलंय. ‘सरावन बाळ जातो काशीला’ अशा काहीशा ग्रामीण भाषेतून सुरु झालेला जाखडी नृत्याचा प्रवास आता ध्वनीफीत आणि चित्रफितीपर्यंत पोहोचला आहे. आता या कलेने उच्चभ्रूवर्गालाही ठेका धरायला लावले आहे.
रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यात या लोककलेने चांगलेच मूळ धरले आहे. या लोककलेतून त्या त्या भागातील लोकसंस्कृतीचा आविष्कार आजही पाहायला मिळतो आहे.
आता गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने जाखडी नृत्याच्या सरावाला जोरदार तयारी सुरु झाली असून, जाखडीचे सूर आता गावोगावी घुमू लागले आहेत. वाडीवाडीवर रात्रभर जाखडीचा सराव होत असल्याने कोकणवासीयांना गौरी गणपतीची वर्दी मिळू लागली आहे. त्यामुळे या गौरी गणपतीच्या सणात आता हे जाखडी नृत्यही प्रेझेंटेबल होऊ लागले आहे. त्याची लोकप्रियता आता उच्चभ्रू वर्गातही वाढत आहे. (वार्ताहर)

Web Title: Jakhadi dance is now 'presentable'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.