राष्ट्रवादीकडून भेटीचे निमंत्रण : दीपक केसरकर
By Admin | Updated: July 12, 2014 00:23 IST2014-07-12T00:19:12+5:302014-07-12T00:23:39+5:30
कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतरच नेत्यांची भेट घेणार

राष्ट्रवादीकडून भेटीचे निमंत्रण : दीपक केसरकर
सावंतवाडी : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उद्या, शनिवारी मला भेटीचे निमंत्रण दिले आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतरच मुंबई प्रदेशाध्यक्षांची भेट घेणार असल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडीतील पत्रकार परिषदेत दिली.
आमदार केसरकर हे कुठल्या पक्षात जाणार याबाबत गेले काही दिवस चर्चा सुरू होती; पण ते आपला निर्णय उद्या माडखोल येथील साईबाबा मंदिरात कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच घेणार आहेत. त्यांनी कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांना माडखोल येथे बोलावले असून तेथेच कार्यकर्त्यांनी इच्छा प्रकट करावी, असे आवाहन केले आहे. कार्यकर्त्यांनी आपले म्हणणे मांडल्यानंतर आमदार केसरकर उद्या सायंकाळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मुंबई येथे भेट घेणार आहेत. या भेटीवेळी ते पक्षाजवळ आपली बाजू मांडतील. लोकसभा निवडणुकीनंतर आमदार केसरकर यांना पक्षाच्या नेत्यांनी भेटीचे निमंत्रण देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
मध्यंतरी जिल्ह्यातील कोअर कमिटीशी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी चर्चा केली होती. त्यावेळी आमदार केसरकर यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यांना प्रथमच हे निमंत्रण देण्यात आले आहे. आमदार केसरकर हे मुंबईत पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर सावंतवाडीत येऊन आपल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी तसेच मतदारांशी चर्चा करणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. (प्रतिनिधी)