आठवडा बाजारातही पिकते महागाई
By Admin | Updated: November 23, 2014 00:45 IST2014-11-23T00:45:36+5:302014-11-23T00:45:36+5:30
व्रतवैकल्यांना महागाई डसली : भाज्यांच्या दरांची गगनाशी स्पर्धा, फळांनी गाठली शंभर

आठवडा बाजारातही पिकते महागाई
रत्नागिरी : दैनंदिन आहारात लागणाऱ्या भाज्यांचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. कडधान्यांचे दर गगनाला भिडले असल्याने सर्वसामान्यांना भाजीपाला खाणेही मुश्किल बनले आहे. स्वस्त बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आठवडा बाजारातही महागाई गगनाला भिडली आहे. त्यातच उद्यापासून व्रतवैकल्याचा मार्गशीर्ष सुरू होत आहे. त्यामुळे भाज्या व फळे यांची वाढणारी मागणी लक्षात घेऊन आधीच भाज्या आणि फळांचे दर कडाडले आहेत.
आठवडा बाजारात कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील भाजी विक्रेते अधिक येतात. त्यांच्या तुलनेत स्थानिक विक्रेत्यांची संख्या मात्र ५ ते ७ टक्के इतकीच आहे. पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्य, फळेविक्रेते मोठ्या संख्येने येतात. दरमहा किराणा खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या अधिक असली तरी दर आठवड्याला लागणाऱ्या भाज्या, कांदे, बटाटे खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. आठवडा बाजारात भाज्यांचे दर चांगलेच वाढले असून त्याच्या जोडीला हिरवी मिरची ४० रूपये, आलं ८० रूपये किलो दराने विकण्यात येत होते. गतआठवड्यात २० रूपये किलो दराने विकण्यात येणाऱ्या टोमॅटोचे दर खाली आले आहेत. १० रूपये किलो दराने टोमॅटो विक्री सुरू आहे.
शेपू, मेथी, पालक, मूळा, माठ पालेभाज्या १५ रूपये जुडी तर आंबट चुका, कोथींबीर १० रूपये जुडी दराने विकण्यात येत होती. कोबी गड्डे १० ते २० रूपये प्रति नग तर फ्लॉवर २० ते २५ रूपये प्रतिनग दराने विकण्यात येत होते.
स्थानिक विक्रेत्यांकडे मूळा, माठ, पावटा, वांगी, पडवळ, दोडकी, काकडी, भोपळा, दूधी भोपळा, आमसूले, नारळ, कुळीथ, भेंडी, गावठी अंडी, गवती चहा यांची विक्री सुरू होती. गावठी पावटा १०० रूपये किलो, भेंडी ८० रूपये किलो, पडवळ, दोडके ६० रूपये किलो दराने विकण्यात येत होते. वालीच्या शेंगा, माठ, मूळा १५ रूपये जूडी, भोपळ्याची कापलेली शेड १० ते १२ रूपये, दूधी भोपळा २५ ते ३० रूपये प्रति नग, नारळ २० ते २५ रूपये प्रति नग, गावठी अंडे ५ ते ६ रूपये दराने विकण्यात येत होते. कुळीथाची विक्री ८० रूपये किलो दराने सुरू होती. मार्गशीर्षामध्ये श्री महालक्ष्मीचे व्रत सुवासिनी, कुमारिका करतात. यावेळी महालक्ष्मीची पूजा करण्यात येते. गेल्या काही वर्षात ग्रामीण भागातही या उत्सवाने जोर घेतला आहे. त्यामुळे ही व्रतवैकल्ये आता ग्रामीण महिलाही करताना दिसतात. पर्यायाने या काळात भाज्यांचे आणि फुलांचे दर वाढतात. यादिवशी दिवसभर उपवास केला जातो. पूजेसाठी पाच फळे आवश्यक असतात. शिवाय दर्शनाला येणाऱ्यांना फळे, फुले देण्याची प्रथा आहे. त्यामुळे श्रावणमासाप्रमाणे मार्गशीर्षातही फळांचा खप वधारतो. बाजारात सफरचंद, मोसंबी, संत्री, चिकू, केळी, पेरू, डाळींब, पेर, टरबूज, पपई आदी विविध प्रकारची फळे विक्रीस उपलब्ध आहेत. थंडी अद्याप गायब असून उष्मा मात्र वाढला आहे. उकाड्याने हैराण होत असल्याने लिंबूपाणी, लिंबू सरबताचा खप वाढला आहे. लिंबूला मागणी वाढल्याने १० रूपयाला ४ ते ५ नग दराने विक्री सुरू आहे. (प्रतिनिधी)