मालवणात समुद्र तळाची स्वच्छता, भारतातील पहिलाच प्रयोग यशस्वी

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: November 28, 2024 13:36 IST2024-11-28T13:33:29+5:302024-11-28T13:36:18+5:30

पर्यावरणवादी स्टालिन दयानंद यांनी स्वीकारले आव्हान : सहा स्कुबा डायव्हर्सनी ३ तासात ३०० किलो प्लास्टिक कचरा काढला बाहेर

India first seabed cleaning campaign at Malvan, Sindhudurg  | मालवणात समुद्र तळाची स्वच्छता, भारतातील पहिलाच प्रयोग यशस्वी

मालवणात समुद्र तळाची स्वच्छता, भारतातील पहिलाच प्रयोग यशस्वी

संदीप बोडवे

मालवण : वनशक्ती या संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणात कार्यरत असलेले प्रसिद्ध पर्यावरणवादी दयानंद स्टालिन यांनी आता सागर शक्ती या उपक्रमांतर्गत सागरतळाची स्वच्छता करण्याचे आव्हान स्वीकारले आहे. यासाठीच्या पायलट प्रयोगाची सुरुवात बुधवारी मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला परिसरातील समुद्रातून करण्यात आली. भारतातील हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पहिल्याच प्रयत्नात समुद्र तळाच्या एक हेक्टर परिसरातून सहा स्कुबा डायव्हर्सनी ३ तासात तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा बाहेर काढला.

स्टालिन दयानंद म्हणाले, समुद्रात सूक्ष्म प्लास्टिक वाढत आहे. यातून मानवाला कॅन्सरसारख्या रोगांचा धोका आहे. वाढत्या समुद्री कचऱ्याच्या समस्येवर काम करताना आम्ही मालवण येथून सुरुवात केली आहे. मालवणचा समुद्र तळ सागरी जैवविविधतेने समृद्ध आहे. याठिकाणी समुद्री कचऱ्याची ही समस्या मोठी आहे. याचा परिणाम येथील सागरी जैवविविधतेवर पर्यायाने मासेमारी आणि पर्यटन उद्योगावर होत आहे.

कचऱ्यात काय मिळाले....१) प्लास्टिक बॉटल्स २) प्लास्टिक पिशव्या ३) खाद्य पदार्थांची वेस्टने ४) काचेच्या बॉटल्स ५) तुटलेली जाळी ६) अडकलेले सागरी जीव.

...यांनी राबविली मोहीम

वन शक्ती, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, भारतीय मत्स्यकी सर्वेक्षण विभाग यांच्या सहकार्याने, सागर शक्ती, मालवण नगर परिषद, महाराष्ट्र वन विभाग, युथ बीट फॉर क्लायमेट, नीलक्रांती आदी संस्थांनी एकत्रित येत ही मोहीम राबविली.

सिंधुदुर्ग शून्य प्लास्टिक क्षेत्रासाठी प्रयत्न करणार

सागरी तळाच्या स्वच्छतेच्या पायलट प्रकल्पाला आता सुरुवात झाली असली तरीही आम्ही दीर्घ काळाच्या योजनेवर काम करणार आहोत. मालवणचा समुद्र किनारा आणि समुद्राचे पाणी स्वच्छ करणे, हा आमचा संकल्प आहे. भविष्यात सिंधुदुर्ग शून्य प्लास्टिक क्षेत्र होण्यासाठीही आम्ही प्रयत्न करणार आहोत. - स्टालिन दयानंद, पर्यावरणवादी

Web Title: India first seabed cleaning campaign at Malvan, Sindhudurg 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.