सायबर क्राईमची वाढती शृंखला; पोलीस हतबल
By Admin | Updated: August 25, 2014 22:53 IST2014-08-25T22:17:06+5:302014-08-25T22:53:13+5:30
ग्राहकांची उडाली झोप : पोलीस यंत्रणेला गुन्ह्याचे धागेदोरे मिळणे झाले अवघड

सायबर क्राईमची वाढती शृंखला; पोलीस हतबल
रत्नागिरी : सध्या सायबर गुन्हेगारीने अवघ्या जगाची झोप उडविली आहे. एटीएमचा पासवर्ड कळताच संबंधित ग्राहकाच्या खात्यावरून हजारो रूपये हातोहात लंपास करण्याचे प्रकार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत.
मात्र, याबाबत नागरिकांना सतर्क करून स्वत:ही तत्पर असण्याची अपेक्षा असलेले पोलीस या गुन्हेगारीने हतबल झालेले दिसत आहेत. त्यामुळे ग्राहकांना असे बनावट फोन आले आणि ते पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेले. ‘पैसे गेले नाहीत ना, पैसे गेले तरच लेखी तक्रार नोंदवायला या’ अशी भूमिका पोलिसांची असल्याने आता असे बनावट फोन आले तरी पोलिसांकडे जाच कशाला, अशी नागरिकांची मानसिकता होऊ लागली आहे.
सध्या सर्वच बँकांच्या काही ग्राहकांना अनोळखी भ्रमणध्वनीवरून फोन येत आहेत. त्यावरून काही कारण सांगून त्या ग्राहकांच्या एटीएमचा पासवर्ड विचारण्याचा प्रयत्न केला जातो. काही ग्राहकांनी फोन करणाऱ्या या व्यक्तिला आपला पासवर्ड क्रमांक सांगूनही टाकला. त्यामुळे त्यांच्या खात्यावरील पैसे परस्पर काढले गेले आहेत. हे प्रकार वाढल्याने बँकांनी खबरदारी म्हणून बँकांमध्ये, परिसरात अशा फोनवर विश्वास न ठेवण्याचे फलक लावले आहेत.
तरीही असे फोन येतच आहेत. काहींची फसवणूकही होत आहे. मात्र, ज्यांना फोन आले आणि काही ग्राहक त्यामुळे सावध झाले आणि इतरांनाही सावध करण्यासाठी त्या भ्रमणध्वनी क्रमांकाचा शोध घ्यावा, म्हणून पोलिसांकडे गेले तर तिथे वेगळाच अनुभव आला.
रत्नागिरी येथील पोलीस ठाण्यात गेल्या दोन - तीन महिन्यांत अशा प्रकारच्या तक्रारी नोंदवण्यात आलेल्या आहेत. मात्र, ज्यांचे पैसे गेले आहेत, त्यांच्याच तक्रारी नोंदवून घेतल्या जातात. पण, ज्यांना फोन आले आणि त्यांनी सावध होऊन आपले पासवर्ड दिले नाहीत, त्यांचे खाते ‘सेफ’ राहिले. तरीही अशांनी हा नंबर पोलिसांना देण्यासाठी सहकार्य दाखविले. मात्र, त्याबाबत पोलिसांचच उदासीनता दिसून येते.
हे नंबर सर्रास इतर राज्यातून आलेले आहेत. त्यामुळे पोलिसांना त्यांचा माग काढणे अतिशय अवघड आहे. मात्र, हे मोबाईल नंबर कुठचे आहेत, हे कळू शकते, तर पोलीस यंत्रणा पुढचा छडा लावण्याची तयारी का दाखवत नाहीत, असा सवाल उठत आहे. खरंतर काळानुरूप या यंत्रणेनेही ‘अपडेट’ असायला हवे. मुख्य म्हणजे किती पोलिसांना इंटरनेटची माहिती आहे, हा संशोधनाचा मुद्दा आहे.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बँकांची एटीएम सेवा धोक्यात आहे. असे असताना एटीएम जास्त आणि सुरक्षारक्षक कमी तेही शस्त्रधारी न ठेवता दंडुकाधारी. त्यामुळे एटीएम यांची, पैसे हे कमावणार, मग त्यांच्यावर निगराणी मात्र आम्ही ठेवणार, असा पोलिसांचा रोष बँकांवर दिसून येत आहे. त्यामुळेही पोलिसांमध्ये उदासीनता दिसून येत आहे. मात्र, सायबर क्राईमच्या या नव्या संकटाने सर्व बँकांच्या ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे, एवढे नक्की. (प्रतिनिधी)