सिंधुदुर्ग जिल्ह्याची उत्पादन क्षमता वाढवा, नारायण राणे यांचे आवाहन

By सुधीर राणे | Updated: April 12, 2025 17:59 IST2025-04-12T17:59:00+5:302025-04-12T17:59:42+5:30

वाघेरी येथे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डच्या इमारतीचे भूमिपूजन

Increase the production capacity of Sindhudurg district, MP Narayan Rane appeal | सिंधुदुर्ग जिल्ह्याची उत्पादन क्षमता वाढवा, नारायण राणे यांचे आवाहन

सिंधुदुर्ग जिल्ह्याची उत्पादन क्षमता वाढवा, नारायण राणे यांचे आवाहन

कणकवली : वैभववाडी-कोल्हापूर या रेल्वे मार्गाचे लवकरच काम सुरू होईल. आंबा, काजू, कोकमपासून लोणचे, पापडापर्यंतचे सर्व प्रक्रिया उद्योग येथे आणण्यात येतील. तसे प्रयत्न सुरू असून, त्यासाठी जनतेने साथ द्यावी. कोकणातील  प्रत्येक उत्पादनाला महत्त्व आहे. इथल्याच उत्पादनांवर येथेच प्रक्रिया करा. इथेच मार्केटिंग  करून उत्पादने राज्य तसेच देशभर आणि परदेशात पाठवा. तेव्हाच येथील प्रत्येक कुटुंबाचे, प्रत्येक व्यक्तीचे दरडोई उत्पन्न वाढेल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला.

सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कणकवली तालुक्यातील नांदगाव नजीक वाघेरी येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या मार्केट यार्डच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी   पणनमंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री नितेश राणे, माजी मंत्री दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार नारायण राणे म्हणाले, जगात विविध वस्तूंवर प्रक्रिया करणारे  देश आज प्रगतीच्या शिखरावर आहेत. तुम्ही सुध्दा असाच प्रयत्न करा. शेती उत्पन्न वाढवा. वेगवेगळी झाडे लावा. त्यांचे उत्पादन घ्या. दरडोई उत्पन्न जेव्हा तुमचे वाढेल त्यावेळी कुटुंब सुखी होईल. आजही मी स्वतःला साहेब मानत नाही. मी जनतेचा सेवक आहे. दिवसरात्र १४ तास काम करतो. माझ्या जिल्ह्यातील जनता सुखी, समृद्ध झाली पाहिजे म्हणून प्रयत्न करतो. आता माझ्या पावलावर पाऊल ठेवून दोन्ही मुले जनतेसाठी काम करत आहेत.

काम करणारी व्यक्ती आपल्या सोबत

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे हे धडपडी व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा केला. त्यामुळे आज भूमिपूजनापर्यंतची पहिली पायरी पूर्ण झाली. लवकरच मार्केट यार्डचे काम पूर्ण होईल, असा विश्वास निर्माण झालेला आहे. अशी काम करणारी व्यक्ती आपल्या सोबत असल्याचेही तुळशीदास रावराणे यांच्याबद्दल गौरवोद्गार खासदार  राणे यांनी काढले.

बँकेच्या माध्यमातून दिलेला निधी ही बँकेची गुंतवणूक

पालकमंत्री नितेश राणे, मनीष दळवी आणि तुळशीदास रावराणे यांच्या कामाचे कौतुक माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी केले. मंत्री म्हणून नितेश राणे यांचे काम नेहमीच अभिमान वाटावे असे आहे तर जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या मार्केट यार्डसाठी जमीन खरेदी करावी म्हणून बँकेच्या माध्यमातून दिलेला निधी ही बँकेची गुंतवणूक आहे.

जेव्हा हे मार्केट यार्ड सुरू होईल तेव्हा या सर्वांची खाती सिंधुदुर्ग बँकेत खोलली जातील आणि व्यवहार  जिल्हा बँकेच्या माध्यमातून सुरू होतील. ही दूरदृष्टी ठेवून केलेले काम कौतुकास्पद आहे. जिल्हा बँकेने निधी दिला म्हणून आज या ठिकाणी आपण एकत्र जमू शकलो, असे गौरवोद्गारही यावेळी खासदार नारायण राणे यांनी काढले.

Web Title: Increase the production capacity of Sindhudurg district, MP Narayan Rane appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.