त्या २६ गावांमध्ये कोरोना तपासणी चाचण्या वाढवा : वैशाली राजमाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 02:29 PM2021-06-16T14:29:32+5:302021-06-16T14:31:53+5:30

CoronaVirus Kankavli : कणकवली तालुक्यात चार हजार कोरोनाबाधित रुग्ण आहेत, तर २६ गावांतील काही वाड्या कोरोना हॉटस्पॉट ठरल्‍या आहेत. या वाड्यातील प्रत्‍येक नागरिकाची कोरोना तपासणी होण्याच्या दृष्‍टीने चाचण्या वाढवा, असे निर्देश प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी दिले आहेत.

Increase corona testing in those 26 villages: Vaishali Rajmane | त्या २६ गावांमध्ये कोरोना तपासणी चाचण्या वाढवा : वैशाली राजमाने

कणकवली तहसील कार्यालयात मंगळवारी तालुकास्तरीय टास्क फोर्सची बैठक झाली. बैठकीत प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी मार्गदर्शन केले.

googlenewsNext
ठळक मुद्देत्या २६ गावांमध्ये कोरोना तपासणी चाचण्या वाढवा : वैशाली राजमाने कणकवली तालुकास्तरीय टास्क फोर्सची बैठक

कणकवली : कणकवली तालुक्यात चार हजार कोरोनाबाधित रुग्ण आहेत, तर २६ गावांतील काही वाड्या कोरोना हॉटस्पॉट ठरल्‍या आहेत. या वाड्यातील प्रत्‍येक नागरिकाची कोरोना तपासणी होण्याच्या दृष्‍टीने चाचण्या वाढवा, असे निर्देश प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी दिले आहेत.

कणकवली तालुकास्तरीय टास्क फोर्सची बैठक तहसीलदार कार्यालयात प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झाली. यावेळी तहसीलदार रमेश पवार, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सी. एम. शिकलगार, नगरपंचायतचे प्रतिनिधी व इतर कर्मचारी उपस्थित होते. तालुक्‍यात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सद्य:स्थितीत हॉटस्पॉट ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.

त्यामुळे तेथील लोकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि आपले कुटुंब, आपली वाडी, गाव कोरोनामुक्त करण्यास प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन वैशाली राजमाने यांनी केले. तालुक्यात कलमठ, लिंगेश्वर, ओसरगाव, नांदगाव, खारेपाटण दक्षिण बाजार, जानवली, खारेपाटण संभाजीनगर, तोंडवली, तळेरे फोंडाघाट, वागदे, कसवण, तरंदळे, ओझरम्, डामरे, वरवडे, चिंचवली, फोंडा, पियाळी, दारूम, कासरल, कासार्डे, करूळ, फोंडा उत्तर बाजार, घोणसरी आदी २६ गावे अथवा वाड्यांमध्ये मिळून ३८४१ सक्रिय रुग्ण सोमवारपर्यंत आढळून आले आहेत.

शहरांमध्ये कणकवली बाजारपेठ, शिवाजीनगर, विद्यानगर टेंबवाडी , परबवाडी, जळकेवाडी, मधलीवाडी या ठिकाणी मिळून ९९ सक्रिय रुग्ण होते. या प्रत्येक भागात दहा किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण असल्याने हा भाग किंवा
संबंधित गावांमधील वाडी हॉटस्पॉटमध्ये येते.

बंधने पाळली तर हॉटस्पॉट कमी होतील

दहापेक्षा जास्त सक्रिय रुग्ण असलेल्या ठिकाणी गावांमध्ये किंवा वाड्यांमध्ये चाचण्या वाढविण्यात येणार आहेत. आरोग्य विभागाला तशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या असून या वाड्या-वस्त्यांमधील लोकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. या भागातील ४५ वर्षांवरील नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. प्रत्येकाने सामाजिक अंतर राखणे, मास्कचा वापर आणि सॅनिटायझरचा वापर करणे या त्रिसूत्रीचा अंगीकार करावा.

येथील लोकांनी अत्यावश्यक काम वगळता ही साखळी तोडण्यासाठी काही दिवस घरी थांबणे, इतरांमध्ये न मिसळणे अत्यावश्यक आहे. याबाबतची बंधने काही दिवसांसाठी पाळली तर तालुक्यातील हॉटस्पॉट कमी होतील. त्यासाठीचे सर्व प्रयत्न प्रशासनाकडून केले जात आहेत, असेही वैशाली राजमाने यावेळी म्हणाल्या.


 

Web Title: Increase corona testing in those 26 villages: Vaishali Rajmane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.