CoronaVirus Lockdown : वेंगुर्ल्यातील चिन्मय मराठेची आयडियाची कल्पना, साकारले ट्री हाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 18:10 IST2020-05-15T18:08:06+5:302020-05-15T18:10:08+5:30
लॉकडाऊनमुळे गार्डन, स्विमिंग पूल, पर्यटनस्थळे, विविध धार्मिक कार्यक्रम बंद असल्याने लहान मुलांचा वेळ सध्या जाता जात नाही. यातूनच काही ठिकाणची मुले इनडोअर खेळांमध्ये रमली आहेत. पण खेळ, मोबाईल या सर्वाला फाटा देत वेंगुर्ला-भटवाडी येथील चिन्मय मराठे या शालेय मुलाने आपल्या कल्पक बुद्धिचा वापर करून ट्री हाऊस साकारले आहे. आपला बराचसा वेळ अशा नावीन्यपूर्ण उपक्रमामध्ये तो घालवित आहे.

स्वत: तयार केलेल्या ट्री हाऊसमध्ये छोटा चिन्मय रमला आहे.
प्रथमेश गुरव
वेंगुर्ला : लॉकडाऊनमुळे गार्डन, स्विमिंग पूल, पर्यटनस्थळे, विविध धार्मिक कार्यक्रम बंद असल्याने लहान मुलांचा वेळ सध्या जाता जात नाही. यातूनच काही ठिकाणची मुले इनडोअर खेळांमध्ये रमली आहेत. पण खेळ, मोबाईल या सर्वाला फाटा देत वेंगुर्ला-भटवाडी येथील चिन्मय मराठे या शालेय मुलाने आपल्या कल्पक बुद्धिचा वापर करून ट्री हाऊस साकारले आहे. आपला बराचसा वेळ अशा नावीन्यपूर्ण उपक्रमामध्ये तो घालवित आहे.
मे महिन्याची सुटी ही लहान मुलांना पर्वणीच असते. या सुटीत मुलांना घेऊन पालक दूरच्या नातेवाईकांकडे, लग्न समारंभाला तसेच वेगवेगळी पर्यटनस्थळे पहायला जाण्यासाठी छोटे-मोठे प्रवास करतात. बाहेर जाणे शक्य नसेल तर मुलांना आजूबाजूच्या गार्डनमध्ये नेणे, स्विमिंग पूल येथे पोहायला घेऊन जाणे किंवा घरीच मुलांसोबत विविध खेळ खेळत सुटीचा आनंद घेत असतात.
काही वर्षांपूर्वी अशा सुट्यांमध्ये गल्लीतील क्रिकेट, भातुकली यासह जे ग्रुपने खेळता येतील असे खेळ खेळताना लहान मुले दिसायची. त्यानंतर अलीकडे मोबाईलच्या विश्वात मोठ्यांप्रमाणेच लहान मुलेही मोबाईलवर गेम खेळू लागली. त्यामुळे सुट्यांमधील खेळ दिसणे हळूहळू कमी होऊ लागले.
त्यातच सुटीतील काही तास मुलांना अभ्यास, खेळ सोडून अन्य परिसर ज्ञान समजावे यासाठी काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत उन्हाळी वर्ग सुरू केले. यामध्ये मुलांना भविष्यासाठी आवश्यक असे ज्ञान देण्याची सोय आयोजक संस्थांनी केली.
यावर्षी कोरोनामुळे उद्भवलेल्या लॉकडाऊन काळात गार्डन, स्विमिंग पूल, पर्यटनस्थळे बंद असल्याने लहान मुलांना करमणुकीची साधनेच नाहीत. तसेच प्रशिक्षण वर्गही घेता येत नसल्याने मुलांना पूर्ण वेळ हा घरच्या चौकटीतच घालवावा लागत आहे. तर काही मुले पुन्हा एकदा इनडोअर गेम्समध्ये रमली आहेत.
मात्र, वेंगुर्ला-भटवाडी येथील चिन्मय मराठे या तिसरीतील विद्यार्थ्याने ट्री हाऊसच्या संकल्पनेनुसार आंब्याच्या झाडावरच एक छोटसे घर बनविले आहे. यासाठी त्याने मातीबरोबरच काही टाकाऊ वस्तूंचा वापर केला. आपल्या कल्पक बुद्धिमत्तेने त्या ट्री हाऊसमध्ये दिवा लावण्यासाठी जागा, झाडांच्या खोडातून खिडकीसह घराला छपराची मांडणी केली. या ठिकाणीच बसून तो काहीकाळ गोष्टींची पुस्तके वाचणे, अभ्यास करणे यात रमत आहे. ट्री हाऊसच्या बाजूला दोरी व टायरच्या सहाय्याने झोपाळाही बनविला आहे.
घरातील उपलब्ध साधनसामुग्रीचा वापर
चिन्मयने ही सारी संकल्पना पुणे येथील आपल्या मावसभावाला सांगितली. तसेच आपल्या ट्री हाऊसचे फोटोही शेअर केले. ते सारे पाहून त्यानेही आपल्या घरात उपलब्ध साधनसामुग्रीच्या सहाय्याने हाऊस बनविले आहे.