मंत्री दीपक केसरकरांची ऑफर, सावंतवाडीचे शिवसेना तालुकाप्रमुख म्हणाले...
By अनंत खं.जाधव | Updated: August 16, 2022 17:47 IST2022-08-16T17:47:16+5:302022-08-16T17:47:54+5:30
पर्यटन निधीतून उभारण्यात आलेल्या विविध प्रकल्पात मोठा आर्थिक अपहार

मंत्री दीपक केसरकरांची ऑफर, सावंतवाडीचे शिवसेना तालुकाप्रमुख म्हणाले...
सावंतवाडी : मी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत नेहमीच एकनिष्ठ राहिलो असून भविष्यात ही राहणार आहे. काल माझ्या गावातील नेमळे ग्रामसचिवालयाच्या उद्घाटनाला मंत्री दिपक केसरकर यांनी जो काही संभ्रम निर्माण केला त्यामुळे मला काही फरक पडणार नाही. कारण एकनिष्ठेची किंमत गद्दारांना काय कळणार त्यांना जळीस्थळी राजकारणच दिसणार अशी जोरदार टिका शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी केली.
काल, सोमवारी नेमळे येथील ग्रामसचिवालय उद्घाटन कार्यक्रमात मंत्री केसरकर यांनी शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांना उद्देशून जास्त उशीर करु नका लवकर आमच्याकडे या अशी ऑफर दिली होती. या पार्श्वभूमीवर राऊळ यांनी आज, मंगळवारी आपली भूमिका मांडत केसरकर यांनी जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे.
राऊळ म्हणाले, आपण केसरकरांसोबत साडेसात वर्ष काम केले. त्याना मी जवळून ओळखतो. ते दगड एकीकडे मारतात पण निशाणा दुसरीकडे असतो, नेमकं कालच्या त्याच्या वाक्यात निशाणा दुसरीकडे होता. तेथे असलेल्या अन्य भाजपच्या नेत्यांना उद्देशून त्यांनी ही गुगली टाकली आहे.
निमंत्रण असल्याने तिथे गेलो
मात्र त्यांनी माझ्याबाबत केलेल्या वाक्याचा विपर्यास कोणीही करून घेऊ नये. कारण काल, आज, उद्या मी शिवसेनेसोबत आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच एकनिष्ठ आहे आणि राहणार. केवळ माझ्या गावच्या ग्रामसचिवालयाचे उद्घाटन असल्याने आणि निमंत्रण असल्याने आपण तिथे गेलो. त्यामागे अन्य काहीही कारण नाही असे त्यांनी सांगितले.
पर्यटन निधीतून उभारण्यात आलेल्या विविध प्रकल्पात मोठा आर्थिक अपहार
केसरकर यांच्या मागच्या काळात झालेल्या चांदा ते बांदा या योजनेसह आंबोलीत पर्यटन निधीतून उभारण्यात आलेल्या विविध प्रकल्पात मोठा आर्थिक अपहार झाला आहे. तो आम्ही लवकरच पुराव्यानिशी उघड करू, असा इशारा ही राऊळ यांनी दिला. केसरकर यांना मतदारांचा त्यांना विसर पडला आहे. कालच्या दौर्यात त्यांनी मल्टीस्पेशालिटी तसेच अन्य प्रश्नावर भाष्य केले नाही, यातूनच जनते बद्दल असलेले प्रेम दिसून येते असेही राऊळ म्हणाले.