उच्च न्यायालयाचा निर्णय दिलासादायी
By Admin | Updated: December 27, 2014 00:00 IST2014-12-26T21:50:41+5:302014-12-27T00:00:41+5:30
राजेंद्र पारकर : बीएएमएस डॉक्टर्सविरोधातील रिट फेटाळली

उच्च न्यायालयाचा निर्णय दिलासादायी
कणकवली : बीएएमएस डॉक्टर्सना अॅलोपॅथीचा अधिकारी देणारी नोटिफिकेशन्स, शासन निर्णय व कायद्यातील सुधारणा यांना अंतरिम स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे येथील शाखेने बीएएमएस डॉक्टर्सना अॅलोपॅथीची प्रॅक्टीस करू देण्याच्या विरोधात रिट याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाचा निकाल दिलासा देणारा असल्याचे डीएफसीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र पारकर यांनी येथील पत्रकार परिषदेत सांगितले.
महाराष्ट्र शासनाने १९६५ साली, २५ नोव्हेंबर १९९२ रोजी व पुन्हा ड्रग अॅक्ट सेक्शन (२) ९९ (३) नुसार २३ फेबु्रवारी १९९९ रोजी अधिसूचना काढून अॅलोपॅथीच्या आवश्यक त्या वापरास परवानगी दिली आहे. केवळ अधिसूचनांवर अवलंबून राहू लागू नये म्हणून जून २०१४ मध्ये महाराष्ट्र वैद्यक व्यावसायिक कायदा १९६१ या कायद्यात सुधारणा करून या डॉक्टर्सच्या अॅलोपॅथी वापरास कायदेशीर मान्यता देण्यात आली. याच कायद्यात बीएएमस नंतर एमडी, एमएस केलेल्या आधुनिक डॉक्टर्सनाही आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक कौशल्ये व आधुनिक ज्ञान शस्त्रक्रिया यांच्या वापरास त्यांच्या ज्ञानाच्या प्रमाणात परवानगी देण्यात आली. ग्रामीण भागातील जनतेची गरज जाणून हा निर्णय घेतला गेला.
परंतुआयएमएच्या पुणे शाखेने ग्रामीण भाग, तेथील आरोग्य यंत्रणा, गरीबी, एमबीबीएस डॉक्टर्सची अनुपलब्धता यांचा काहीही विचार न करता या कायदेशीर तरतूदींना स्थगिती देण्यासाठी रिट पिटीशन दाखल करण्यात आली होती.
बीएएमएस डॉक्टर्सनाही पाच वर्षे प्रशिक्षण घ्यावे लागते. त्यांना प्रशिक्षण काळात डॉक्टरी व्यवसायाचे आधुनिक ज्ञान मिळते. आयुर्वेदाचे जनक यांना तर ‘फादर आॅफ सर्जरी’ म्हटले जाते. बीएएमएस डॉक्टर्सच्याही अद्ययावत राहण्यासाठी दर महिन्याला सेमिनार्स होतात. राज्यातील खेड्यापाड्यातील गरजू रूग्णांची गरज आमच्या सारखे बीएएमएस डॉक्टर्स भागवत आहेत.
सिंधुदुर्गातील ८.५ लाख लोकसंख्येसाठी १३ फिजिशिअन्स, ८ सर्जन्स, ५ कान-नाक-घसा तज्ञ, २० बालरोगतज्ञ, ३ पॅथोलॉजिस्ट, ५ रेडिओलॉजिस्ट व फक्त २० एमबीबीएस डॉक्टर्स असून तेही तालुक्याच्या ठिकाणी किंवा महामार्गावर आहेत. ४०० च्या आसपास बीएएमएस, बीएचएमएस डॉक्टर्स जिल्ह्यातील आरोग्ययंत्रणा आणि जनरल प्रॅक्टीस सांभाळत आहेत. कमी पैशांत लोकांना सेवा देत आहेत. एनआरएचएम, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रूग्णालय, रूग्णवाहिकांमध्ये बीएएमएस डॉक्टर्सच काम सांभाळत आहेत, हे येथे लक्षात घ्यायला हवे, असे डॉ. पारकर म्हणाले. यावेळी डॉ. मिलिंद कुलकर्णी, डॉ. गुरू गणपत्ये, डॉ. निलेश कोदे, डॉ. गुरूदास कडुलकर, डॉ. संजय पावसकर, डॉ. मिलिंद तेली, डॉ. डेनिस नाडर, डॉ. वाय. एन. सावंत, डॉ. सौदत्ती, डॉ. करमरकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)