‘ते’ शिवसेनेचे राजकारणच : सावंत
By Admin | Updated: July 12, 2014 00:21 IST2014-07-12T00:14:09+5:302014-07-12T00:21:32+5:30
बुटे यांच्या विषयावरुन शिवसेनेनेचा प्रयत्न

‘ते’ शिवसेनेचे राजकारणच : सावंत
कणकवली : माणगाव खोऱ्यात हत्तीच्या हल्ल्यात मृत झालेल्या बुटे यांच्या विषयावरुन शिवसेनेने राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे. नारायण राणे यांनी अशा प्रसंगात कधीही राजकारण केलेले नाही. जनता माझे कुटुंब आहे. अशी भावना ठेवून त्यांनी वेळोवेळी अनेकांना मदतच केली आहे. मात्र, निवडणूक डोळ्यासमोर ठेऊनच शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक हे राजकारण करीत असल्याची टीका काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी केली.
येथील संपर्क कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सतीश सावंत म्हणाले, हत्तींच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत तसेच हत्ती हटविण्यासाठी मंत्रालयात झालेल्या बैठकीला नारायण राणे अनुपस्थितीत होते. अशी टीका वैभव नाईक करीत आहेत. मात्र, नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळातील ताकदीमुळेच हत्तींनी केलेल्या नुकसानीची भरपाई नुकसानग्रस्तांना मिळू शकली आहे. यापूर्वी हत्तीच्या हल्ल्यात सात जणांचा बळी गेला असतानाही शिवसेनेने आंदोलन केले नाही. परंतु आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकारण करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे.
माणगाव येथे घटना घडल्यानंतर पालकमंत्र्यांसह आम्ही वनविभागाच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी मृत बुटे यांची दोन मुले, भाऊ तसेच नातेवाईकांसह वैभव नाईक व अन्य शिवसैनिक कार्यालयात बसल्याचे निदर्शनास आले. मृत बुटे यांच्या नातेवाईकांसमोर शिवसेनेवाले पोहे तसेच केळी खात होते. त्यामुळे वैभव नाईक यांची हीच संस्कृती आहे का? हे त्यांनी जाहीर करावे. मृत व्यक्तींच्या नातेवाईकांसमोर पोहे खाणाऱ्यांना त्यांच्याबाबत किती कळवळा आहे हे यातून स्पष्ट होते. सत्तेत असलेल्या पक्षाचे आमदार दीपक केसरकर विरोधी पक्षासारखे वागत आहेत. त्यांनी हत्तींप्रश्नी पालकमंत्र्यांशी चर्चा केली असती तर निश्चितच तोडगा निघू शकला असता. मात्र, तसे झाले नाही. वनमंत्री पतंगराव कदम, मुख्य सचिव सहारिया, वनविभागाचे प्रधान सचिव प्र्रविण परदेशी यांच्याशी नारायण राणे यांनी चर्चा केली. तसेच पिसाळलेल्या हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी आदेश देऊन त्यांना भाग पाडले. त्यामुळे नाईक यांनी विनाकारण टीका करु नये. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस संपेल या अतिआत्मविश्वासात शिवसेनेने रहावे. राजकीय स्टंटबाजी करणे सोपे आहे. त्यामुळे सहानुभूती मिळेल. मात्र, जनता नारायण राणे यांच्या पाठिशी राहिल, असेही सावंत यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)
मोदी सरकारने भ्रमनिरास केला
अच्छे दिन आयेंगे अशी जाहिरात करीत सत्तेत आलेल्या मोदी सरकारने सर्वसामान्यांना उपयोगी नसलेला अर्थसंकल्प सादर केला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती तशाच राहिल्याने सामान्य जनतेला त्याचा फटका बसणार आहे. काँग्रेसने महागाईत लोटले असे सांगत मते मिळविणाऱ्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने जनतेचा भ्रमनिराश केला आहे, असेही सावंत यावेळी म्हणाले.