कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध धंद्याविरोधात राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे हे आक्रमक झाले आहेत. कणकवली बाजारपेठेतील घेवारी यांच्या इमारतीत सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर गुरुवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास स्वतः छापा टाकत बुकी महादेव रमाकांत घेवारी याच्यासह १२ जणांना रंगेहात पकडले आणि पोलिसांना कळविले. खुद्द मंत्र्यांनीच छापा टाकल्याचे समजताच पोलीस तातडीने तेथे आले. त्यांनी पकडलेल्या १२ जणांवर कारवाई करत जवळपास २ लाख ७८ हजार रुपये रोख रक्कम, मोबाइल, लॅपटॉप अशा प्रकारचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
प्रश्नांची जोरदार सरबत्तीगुरुवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घेवारी यांच्या गोदामात प्रवेश करताच बारा जण पैसे मोजणे, पावत्या करणे यासारखी कामे करत होते. हे पाहून मंत्री राणे यांनी संबंधितांना खडसावले. प्रश्नांची सरबत्ती करत सर्वांना आहे त्या ठिकाणी थांबा, तुम्हाला कारवाई काय असते हे दाखवतो, असे सांगत तत्काळ पोलिसांना माहिती देण्यास सांगितले.
वाचा- अवैधधंद्यांना पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करणार, मंत्री नितेश राणे यांचा इशारा
पोलिस अधीक्षकांची संपर्ककणकवली येथे खुलेआमपणे मटक्यासारखा अवैध धंदा सुरू असताना पोलिस यंत्रणा करते काय, असा सवाल मंत्री नितेश राणे यांनी मुंबईत असलेल्या पोलिस अधीक्षक मोहन दहीकर यांना मोबाइलद्वारे संपर्क साधत केला आणि व्हिडीओ कॉल करत पुरावाच दाखविला.
पोलिस महानिरीक्षकांकडे तक्रार करणारसिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध धंदे चालत असतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार हे धंदे होऊ देणार नाही, असे सांगत या ठिकाणी सापडलेले लॅपटॉप त्याचप्रमाणे मोबाइल साहित्य थेट पोलिस महानिरीक्षकांना सादर करणार असून याविरोधात कडक कारवाई होण्यासाठी भाग पडणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.