शासनाने आता आमचा अंत बघू नये
By Admin | Updated: October 16, 2015 00:49 IST2015-10-15T23:27:41+5:302015-10-16T00:49:47+5:30
महेंद्र नाटेकर : सोनवडे घाटमार्गासाठी धरणे आंदोलन

शासनाने आता आमचा अंत बघू नये
कणकवली : सोनवडे घाटमार्ग व्हावा यासाठी गेल्या ३७ वर्षाहून अधिक काळ आंदोलने केली जात आहेत. तरीही हा घाटमार्ग अनिश्चिततेच्या भोवऱ्यात अडकला आहे. मात्र, या घाटमार्गाबाबत कोणीही जनतेची दिशाभूल करु नये तसेच श्रेयही घेऊ नये. शासनाने आता आमचा अंत बघू नये. येत्या वर्षभरात या घाटमार्गाचे काम मार्गी न लागल्यास उग्र आंदोलन उभारावे लागेल आणि त्याची सर्वतोपरी जबाबदारी शासनावर राहिल, असा इशारा सोनवडे घाटमार्ग संघर्ष समितीचे अध्यक्ष महेंद्र नाटेकर यांनी दिला आहे.कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्हा जोडणाऱ्या सोनवडे घाटमार्गाचे काम गतिमान व्हावे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कणकवली कार्यालयासमोर गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी घाटमार्ग संघर्ष समितीचे परब, शिवाजी देसाई, सुरेश पाटकर, वाय. जी. राणे, माजी आमदार पुष्पसेन सावंत, कोल्हापूर शिवडाव येथील एन. के. कांबळे, लहू कुडतरकर, शिवसेना आमदार वैभव नाईक, उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, युवा सेना जिल्हाध्यक्ष अॅड. हर्षद गावडे, नगरसेवक सुशांत नाईक, उपस्थित होते. संघर्ष समितीने मागणी केल्यानंतर शासनाने पणदूर - घोटगे - सोनवडे गारगोटीपर्यंतचा महामार्ग जाहीर केला. महामार्ग जाहीर केल्यानंतर मधला मार्ग शासनाने करणे आवश्यक होते. पण त्यानंतर उपोषणे, धरणे, रस्ता रोको आंदोलने संघर्ष समितीने केल्यावर घाटमार्गाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. दोन किलोमीटर रस्ता झाला. परंतु, अजून पूर्ण काम झालेले नाही. ५.१५ किलोमीटर रस्ता वनजमिनीतून जातो. गेली २५ वर्षे चर्चा करून या जमिनीला पर्यायी जमीन देण्याचा निर्णय झाला. परंतु, वन्यजीव संरक्षणासाठी पर्यायी मार्ग मिळाला नाही. तसेच १0 किलोमीटरवर राधानगरी अभयारण्य असल्यामुळे पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. (वार्ताहर)
वैभव नाईक : प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील
गेल्या वर्षभराच्या कालावधीत सोनवडे घाटमार्गाचा प्रश्न सोडवण्यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न सुरु आहेत. वनविभागाने या मार्गाला मंजुरी दिली होती. मात्र, कायद्यात बदल झाल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. त्यानंतर वन्यजीव विभागाने अहवाल दिला की, घाटमार्गाची गरज नाही. फेब्रुवारीमध्ये सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय आता केंद्रीयस्तरावर घेतला जाणार आहे. खासदार विनायक राऊत व रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे बैठक घेऊन या प्रश्नावर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन आमदार नाईक यांनी यावेळी दिले.
कार्यकारी अभियंत्याना निवेदन
सोनवडे घाटमार्गाबाबत शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता छाया नाईक यांची भेट घेत निवेदन दिले. या आंदोलनाच्या ठिकाणी कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला.
वातावरण भारावले
सोनवडे घाटमार्गाच्या मागणीसाठी सिंधुदुर्ग वासियांबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातील शिवडावसह अन्य गावातील ग्रामस्थ आंदोलनस्थळी दाखल झाले होते. या सर्वांनी आपल्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करून संपूर्ण वातावरण दुमदुमुन सोडले.