देवच बनले असुरक्षित!
By Admin | Updated: October 27, 2014 23:32 IST2014-10-27T23:31:04+5:302014-10-27T23:32:28+5:30
रत्नागिरी जिल्हा : मंदिरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

देवच बनले असुरक्षित!
प्रकाश वराडकर -रत्नागिरी -तालुक्यातील काळबादेवी येथील मंदिरात झालेल्या चोरीप्रकरणावरून जिल्ह्यातील मंदिर सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यात नोंदणीकृत ८१४ मंदिरे असून, मंदिरातील जमा होणारी देणगी, दानपेट्या, देवतांचे दागदागिने, सोन्या चांदीची रुपे यावर डोळा ठेवून चोरट्यांनी गेल्या दोन वर्षांच्या काळात जिल्ह्यातील अनेक मोठ्या मंदिरातही डल्ला मारला आहे. त्यातील काही चोऱ्या उघड झाल्या असल्या तरी पोलीस खाते व धर्मादाय आयुक्त यांच्या सूचनांनंतरही संबंधित मंदिर व्यवस्थापनांनी चोरी होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या नसल्याचेच मंदिरांतील चोरी प्रकरणातून अधोरेखित झाले असून, त्यामुळे मंदिरातील देवच असुरक्षित झाले आहेत.
तालुक्यातील काळबादेवी येथील स्वयंभू श्री देव रामेश्वर मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्याने फोडली व आतील सुमारे २५ हजारांची रोख रक्कम लंपास केल्याचे २४ आॅक्टोबरला उघडकीस आले. अर्थात या मंदिर व्यवस्थापनाने मंदिरात सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसविले आहेत. मंदिरात रात्रीच्या वेळी प्रवेश करता येऊ नये, यासाठी आवश्यक लोखंडी ग्रील्सही बसविण्यात आली आहेत. असे असतानाही चोरट्याने कुदळीच्या सहाय्याने ग्रीलवर घाव घालून ग्रील्स तोडून आत प्रवेश केला. दानपेटीही त्याचपध्दतीने कुदळीने फोडली व आतील हजारो रुपये घेऊन पोबारा केला. २३ आॅक्टोबरच्या रात्री घडलेला हा प्रकार २४ आॅक्टोबरला पुजारी मंदिरात आल्यानंतर उघडकीस आला.
त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. श्वानपथक बोलावण्यात आले. परंतु श्वानपथकालाही चोरट्याचा माग काढण्यात यश आले नाही. सी. सी. टी. व्ही. कॅमेऱ्यात चोरट्याचे चित्रण झाले आहे. परंतु तो अनोळखी असल्याने त्याला शोधणे हे पोलिसांपुढील आव्हान आहे. अद्याप या चोरट्याचा माग काढण्यात पोलिसांना यश आलेले नाही. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मंदिरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
घटना घडल्या की, मंदिर व्यवस्थापनांना सूचना दिल्या जातात. काही काळ त्यानुसार काळजी घेतली जाते. पुन्हा मंदिरातील मालमत्ता सुरक्षिततेबाबत दुर्लक्ष सुरू होते. इथूनच चोरट्यांची पावले पुन्हा अशा मंदिरांकडे वळू लागतात, असेच आजवरचे चित्र आहे. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांच्या काळात महत्त्वाच्या अनेक मंदिरांमध्ये चोरी झाली आहे. त्यामागे चोरट्यांची राज्यस्तरीय टोळी कार्यरत असल्याचे नंतर पुढे आले होते. राजापूरमधील धूतपापेश्वर मंदिर, रत्नागिरीतील भगवती मंदिरांमध्येही चोरी झाली होती. या दोन्ही मंदिरात चोरी करणाऱ्यांना पोलिसांनी नंतर गजाआड केले होते. मात्र, अनेक मंदिरांतील चोऱ्यांचा तपास अद्याप लागलेला नाही.
पोलिसांकडे सर्वांच्याच सुरक्षिततेची जबाबदारी आहे हे खरे असले मंदिर व्यवस्थापन वा विश्वस्त संस्था यांनीही आपल्या मंदिराच्या सुरक्षिततेची उपाययोजना करणे आवश्यक आहे. परंतु धर्मादाय अधिकारी व पोलिसांच्या सूचना मंदिर संस्था, व्यवस्थापन फारशा गांभिर्याने घेत नाहीत, असेच यातून स्पष्ट होत आहे.
जिल्ह्यात अनेक पुरातन मंदिरे आहेत. त्यामध्ये अनेक जुन्या घडणीच्या मूर्ती आहेत. अशा मूर्तींवरही चोरट्यांचे लक्ष असते. त्यामुळेच भविष्यकाळात मंदिर विश्वस्त संस्था व नोंदणी न झालेल्या मंदिरांच्या व्यवस्थापन संस्थांनी मंदिराच्या सुरक्षिततेबाबत काळजी घेणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे.
मंदिरांची सुरक्षा महत्त्वाची : भिडे
श्री क्षेत्र गणपतीपुळे देवस्थानमध्ये मंदिर व भक्त यांच्या सुरक्षिततेची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. सुरक्षेसाठी देवस्थानकडे १८ सुरक्षारक्षक आहेत. दिवस पाळीत अधिक सुरक्षारक्षक कार्यरत असतात. रात्री चार सुरक्षारक्षक देवस्थानात असतात. त्यापैकी एक रायफलधारी आहे. याशिवाय मंदिर प्रवेशद्वारापासून ते मंदिरात व परिसरात १२ ठिकाणी सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसविण्यत आले आहेत. भक्तांच्या रांगांच्या ठिकाणीही काही गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी कॅमेरे बसविलेले आहेत. रात्रीच्या वेळी वाहने मंदिराच्या आवारात येऊ नयेत म्हणून प्रवेशद्वार उभारण्यात आले असून, तेथे सुरक्षारक्षकही कार्यरत असतो. मंदिरातील वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ज्या मंदिरांना शक्य आहे त्यांनी सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसवावेत. देखभाल वेळच्यावेळी व्हावी. ज्या मंदिरांना शक्य आहे त्यांनी रात्री मंदिरात सुरक्षारक्षक नेमावेत, असे मत गणपतीपुळे देवस्थानचे सरपंच डॉ. विवेक भिडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
नोंदणी नसलेल्या मंदिरांच्या सुरक्षेचे काय?
जिल्ह्यात नोंदणीकृत असलेली ८१४ मंदिरे आहेत. मात्र, ज्यांची सार्वजनिक न्यास नोंदणी झालेली नाही, अशी अनेक मंदिरे आहेत. त्यामुळे अशा मंदिरांच्या सुरक्षिततेचे काय, असाही सवाल यानिमित्ताने निर्माण झाला आहे.
सुरक्षेचे काय?
देवतांची रुपे, दानपेट्यांवर चोरट्यांचे विशेष लक्ष.
८१४ मंदिरे ‘धर्मादाय’कडे नोंदणीकृत.
मंदिरांची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे.
सुरक्षिततेबाबत संस्थांचीच बेफिकिरी.
जुन्या मूर्तींवरही चोरट्यांचे लक्ष.
व्यवस्थापनाने विशेष काळजी घेण्याचे आवश्यकता.
दोन वर्षात मंदिरांमधील चोरीच्या घटनांमध्ये वाढ.