सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळली चमकणारी अळंबी, महाराष्ट्रात प्रथमच नोंद
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: May 14, 2024 13:57 IST2024-05-14T13:57:39+5:302024-05-14T13:57:57+5:30
चमकणारी अळंबीची अधिकृत नोंद महाराष्ट्राच्या जैविकतेमध्ये झाली

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळली चमकणारी अळंबी, महाराष्ट्रात प्रथमच नोंद
रामचंद्र कुडाळकर
तळवडे : सिंधुदुर्ग जिल्हा हि निसर्ग संपन्न भूमी आहे. या भूमीत वेगवेगळ्या प्रकारचे नैसर्गिक सौंदर्य लपलेले आहे. येथे ठिकठिकाणी जैवविविधता आढळते. जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील होडावडे गावात मंगेश माणगावकर यांच्या परसबागेत गतवर्षी पावसाळ्यात सापडलेली बायोलूमिनिकस मशरूम म्हणजेच चमकणारी अळंबीची अधिकृत नोंद महाराष्ट्राच्या जैविकतेमध्ये झाली आहे.
या आधी महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर अभयारण्यात आणि सिंधुदुर्ग मधील तिलारी राखीव संवर्धन क्षेत्रांमध्ये प्रकाशमान बुरशीची नोंद झाली आहे. परंतु होडावडे गावांत सापडलेल्या चमकणाऱ्या अळंबीची नोंद महाराष्ट्रामध्ये प्रथमच झाली असून भारतातील केरळ आणि गोवा राज्यानंतर महाराष्ट्र हे तिसरे राज्य ठरले आहे.
या चमकणाऱ्या अळंबीचे नाव मायसेना क्लोरोफॉस असून या अळंबीची नोंद २६ एप्रिल २०२४ ला जनरल ऑफ थ्रेडेंट टेक्सा नियतकालिकेत प्रसिद्धी झाली आहे. या संशोधनासाठी कुडाळच्या संत राऊळ महाराज कॉलेजचे संशोधक प्राध्यापक डॉ. योगेश कोळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे मंगेश माणगावकर यांनी सांगितले .
महाराष्ट्रात प्रथमच नोंद
महाराष्ट्रात प्रथमच याची नोंद झाल्यामुळे सिंधुदुर्गच्या जैवविविधतेत आणखी भर पडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील होडावडे गावच्या नावलौकरीरात भर पडली आहे. तसेच अभ्यासकांना पर्यावरण प्रेमींसाठी या अळंबीच्या अभ्यासाची संधी मिळाली आहे .
मंगेश माणगावकर यांची विविधांगी परसबाग
या अळंबी बरोबरच मंगेश माणगावकर यांनी त्यांच्या बागेत आढळलेली विविध पक्षी, फुलपाखरे, साप,आणि बेडकाच्या जातीची नोंद केल्या असून त्यांच्या बागेला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत.