जवखेडा प्रकरण सीबीआयकडे सोपवा
By Admin | Updated: December 9, 2014 00:54 IST2014-12-08T20:58:05+5:302014-12-09T00:54:57+5:30
भालचंद्र मुणगेकर यांची राष्ट्रपतींकडे मागणी

जवखेडा प्रकरण सीबीआयकडे सोपवा
कणकवली : नगर जिल्ह्यात सतत होणाऱ्या दलित हत्याकांडाची योग्य ती चौकशी कालबद्धपणे करून गुन्हेगारांना शासन करण्यात महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा अकार्यक्षम ठरली आहे. त्यामुळे सोनई, खर्डा आणि जवखेड हत्या प्रकरणे सीबीआयकडे सोपविण्यासाठी मध्यस्थी करावी, अशी मागणी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे पत्रकाद्वारे केली आहे.
खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी राष्ट्रपती भवनात प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. २००७ ते २०११ या काळात देशात दलितांवर १ लाख ७० हजार, तर सुमारे २६ हजार आदिवासींवर अत्याचार झाले. या अत्याचारांना जबाबदार असलेल्यांना शिक्षा करण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने संपूर्ण दलित समाजात याविरोधात प्रचंड असंतोष आहे. त्याचा स्फोट कधीही होऊ शकतो. महाराष्ट्र हे सामाजिकदृष्ट्या पुरोगामी राज्य समजले जाते. परंतु, दलित अत्याचारांबाबत हे राज्य व विशेषत: नगर जिल्हा संबंध देशात आघाडीवर आहे. याकडेही राष्ट्रपतींचे लक्ष वेधण्यात आले. (वार्ताहर)