नांदगाव ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा; ग्रामस्थांचा आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 11:39 AM2021-02-03T11:39:25+5:302021-02-03T11:40:33+5:30

water sindhudurg- नांदगाव येथील अनियमित पाणीपुरवठा होत असलेल्या आठ वाड्यांमधील नळ ग्राहकांनी सोमवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर घागर मोर्चा काढला. यामध्ये सुमारे सव्वाशे ग्रामस्थ सहभागी झाले होते. दोन तासांच्या चर्चेनंतर दहा दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर मोर्चा समाप्त झाला.

Ghagar Morcha at Nandgaon Gram Panchayat; The outcry of the villagers | नांदगाव ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा; ग्रामस्थांचा आक्रोश

नांदगाव ग्रामपंचायतीसमोर नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर यांनी आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी उपसरपंच नीरज मोरये, नांदगाव ग्रामविस्तार अधिकारी हरमळकर उपस्थित होते. (छाया : निकेत पावसकर)

googlenewsNext
ठळक मुद्देनांदगाव ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा; ग्रामस्थांचा आक्रोशकोणी पाणी देता का पाणी? घोषणांनी परिसर दणाणला

तळेरे : नांदगाव येथील अनियमित पाणीपुरवठा होत असलेल्या आठ वाड्यांमधील नळ ग्राहकांनी सोमवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर घागर मोर्चा काढला. यामध्ये सुमारे सव्वाशे ग्रामस्थ सहभागी झाले होते. दोन तासांच्या चर्चेनंतर दहा दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर मोर्चा समाप्त झाला.

नांदगाव येथील वाशिनवाडी, नांदगाव तिठा, खालची मुस्लीमवाडी, सिसयेवाडी, बिडयेवाडी, मोरयेवाडी, पाटीलवाडी, पावाचीवाडी अशा आठ वाड्यांसाठी असलेल्या नळपाणी योजनेतून गेले अनेक दिवस अनियमित पाणीपुरवठा होत आहे. या वाड्यांना नियमित पाणीपुरवठा करावा अन्यथा घागर मोर्चा काढू, असे लेखी निवेदन देण्यात आले होते. त्याअनुषंगाने काढण्यात आलेल्या मोर्चात बहुसंख्येने नळ ग्राहक सहभागी झाले होते.

ह्यकोणी पाणी देता का पाणी, पाणी नाही नळाला, ग्रामपंचायत हवी कशाला, पाणी सुरळीत करा, नांदगावातील नळ ग्राहकांचा विजय असो अशा घोषणांनी नांदगाव परिसर दणाणून गेला होता. यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. हंडे, घागरी वाजवत कोणी पाणी देता का हो पाणी अशी घोषणा देत नळपाणी ग्राहकांचा मोर्चा ग्रामपंचायतवर धडकला.

दोन तास चर्चा झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार १० दिवसांची मुदत देण्यात आली. या कालावधीत पाणी सुरळीत न झाल्यास १२ फेब्रुवारीला पुन्हा ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी आला. याबाबत सरपंच व उपसरपंच यांनी मोर्चात सहभागी ग्राहकांना माहिती देताना सांगितले की, केसीसी कंपनीमुळे आपली नळ पाईप लाईनची कामे बाकी आहेत. त्यांना सूचना देऊनही कार्यवाही होत नाही. त्यामुळे तुमची आम्हांला साथ हवी आहे.

यावेळी तोसिम नावलेकर, बाळा सातोसे, दीपक मोरजकर, सोसायटी चेअरमन रवींद्र तेली, बाळा मोरये, बाळा बिडये, विटू बिडये, समीर नावलेकर, हसन नाचरे, संतोष बिडये, कमलेश मोदी तसेच घागर मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी नांदगाव शाखाप्रमुख राजा म्हसकर उपस्थित होते. ग्रामपंचायतीकडून या चर्चेत नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर, उपसरपंच नीरज मोरये, नांदगाव ग्रामविस्तार अधिकारी हरमळकर, भाई मोरजकर तसेच सदस्य, केसीसी कंपनी तसेच जीवन प्राधिकरण अधिकारीही उपस्थित होते.

पोलीस बंदोबस्त तैनात

सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून नळ ग्राहक नांदगाव, ओटव फाट्यावरील बॉक्स पुलाखाली जमा झाल्यानंतर ११ वाजता घागर मोर्चाला सुरूवात झाली. नांदगाव ओटव फाटा ते नांदगाव ग्रामपंचायतपर्यंत पायी चालत घागर मोर्चा काढण्यात आला. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
 

Web Title: Ghagar Morcha at Nandgaon Gram Panchayat; The outcry of the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.