मत्स्य व्यवसायातून परकीय चलन मिळेल
By Admin | Updated: July 29, 2014 23:01 IST2014-07-29T21:57:18+5:302014-07-29T23:01:08+5:30
पंकज भावे : ओरोस येथे कार्यशाळा

मत्स्य व्यवसायातून परकीय चलन मिळेल
ओरोस : ओरोस शरद कृषीभवन येथे मत्स्य व्यवसायातील उपलब्ध साधनातील पायाभूत मुलभूत व भौतिक सुविधांच्या विकासाकडे केंद्र व राज्याचे लक्ष केंद्रीत करून व्यवसायाचे प्रमोशन केल्यास या मत्स्य व्यवसायातून भारताला मोठे परकीय चलन मिळू शकते, असे विचार भारत सरकारच्या मत्स्य उद्योग विकास महामंडळाचे संचालक पंकज भावे यांनी व्यक्त केले.
शरद कृषी भवन ओरोस येथे मत्स्य व शेती, उद्योगाविषयी कार्यशाळेचे आयोजन शरद कृषी भवन ट्रस्टच्यावतीने उद्योजक अविनाश चमणकर यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते.
या एकदिवशीय कार्यशाळेत उत्तेकर फिशरिजचे संचालक रुपेश सकपाळ, मत्स्य उद्योग वरिष्ठ शास्त्रज्ञ ए. के. बलांगे, नॅशनल असोसिएशन आॅफ फिशरमनचे अध्यक्ष राजहंस टक्के, अविनाश चमणकर, जेनेसीस व्हेन्चर्स इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष विरेंद्र कोलेकर, व्हिक्टर डॉन्टस, अबीद नाईक आदी उपस्थित होते.
यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शकांनी भारतात व राज्यात मत्स्य व्यवसायातील उपलब्धता यामध्ये येणारी बंदरे, तेथील सोयी सुविधा याबाबत माहिती दिली. शेतीप्रमाणेच मत्स्य व्यवसाय हा समुद्री शेतीचाच एक भाग आहे. मत्स्य व्यवसायिकतेचा दृष्टीकोन ठेवून मच्छिमारांनी मच्छिमारी करणे आवश्यक आहे. या चर्चेत आपल्या राज्यात एकही अद्ययावत जेटी नाही. ससून, माझगाव या डॉक या अत्याधुनिक नाहीत. ब्रिटीशकालीन असून त्यामध्ये सोयी सुविधा नाहीत हीच स्थिती बंदरांची आहे. कमी गुंतवणुकीत जादा नफा देणारा व्यवसाय मत्स्य व्यवसाय आहे. प्रजनन व पालन पोषण याबाबत स्लाईड शोमार्फत माहिती देण्यात आली. यावेळी शेतकरी मच्छिमारांनी चर्चेत सहभाग घेतला. जेनेसीस व्हेन्चर्स इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष विरेंद्र कोलेकर यांच्यासह उपस्थितांचा उद्योजक अविनाश चमणकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन शेखर सामंत, स्वागत अविनाश चमणकर यांंनी केले तर आभार सुरेश कौलगेकर यांनी मानले. (वार्ताहर)
सुविधा पुरविणे गरजेचे
शासनाने फिश लँडींग सेंटर, बोटी स्थिर ठेवण्याची सुविधा, बर्फ फॅक्टरी, खलाशांना लाईफ जॅकेट, अॅम्ब्युलन्स, जवळच पोलीस कस्टम, बंदर मत्स्य कार्यालये, रस्ता, आरोग्यविषयक सुविधा पुरविणे गरजेचे आहे.