दारिस्ते ग्रामस्थांचा अभियंत्याला घेराव
By Admin | Updated: July 14, 2014 00:03 IST2014-07-13T23:52:00+5:302014-07-14T00:03:46+5:30
संभाव्य धोका टाळण्यासाठी

दारिस्ते ग्रामस्थांचा अभियंत्याला घेराव
कनेडी : कणकवली तालुक्यातील दारिस्ते वरची पटेलवाडी येथील रस्त्याच्या मधोमध वीज वितरणच्या वीजवाहिन्या गुरूवारी पहाटे झालेल्या वादळी पावसामुळे तुटून पडल्याने धोका निर्माण झाला आहे. वीज वितरणच्या सांगवे येथील कनिष्ठ अभियंत्यांना तत्काळ घटनेची माहिती देऊनही दुपारी २ वाजेपर्यंत दखल घेतली गेली नाही. याबाबत येथील नागरिकांनी अभियंत्याला घेराव घालत जाब विचारला.
दारिस्ते वरचीवाडी या रस्त्याजवळच प्राथमिक शाळा आहे. याच मार्गावर गुरूवारी पहाटे वादळी पावसाने वीज वितरणच्या वीजवाहिन्या पडल्या होत्या. सकाळी मुले याच मार्गाने जातात. संभाव्य धोका टाळण्याच्या उद्देशाने येथील उपसरपंच संजय सावंत यांनी याबाबत तत्काळ कनेडी सांगवे येथील अभियंत्यांना घटनेची माहिती दिली व वीजप्रवाह बंद करण्याबाबत सांगितले. परंतु दुपारी २ वाजेपर्यंत वीजप्रवाह बंद करण्यात आला नव्हता. यावरून वीज वितरणचा निष्काळजीपणा दिसून आला.
येथील सरपंच, उपसरपंच निवेदिता सावंत, संजय सावंत, पोलीस पाटील हेमंत सावंत, कार्यकर्ते आणि नागरिकांनी वीज वितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांना घेराव घालत याबाबत जाब विचारला.
कार्यकर्त्यांनी अभियंत्यांच्या अकार्यक्षमतेविषयी संताप व्यक्त केला. तसेच पुढे होणाऱ्या अपघाताला वीज वितरण जबाबदार राहील, असा इशारा दिला.
यापूर्वीही येथील गावांमध्ये अशाप्रकारच्या घटना घडल्या असल्याने वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी सदैव तत्पर राहणे गरजेचे असल्याचे संजय सावंत यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)