बासरीच्या ‘अमर’ सुरांनी रत्नागिरीकरांना नादावले!
By Admin | Updated: September 28, 2015 23:20 IST2015-09-28T22:11:14+5:302015-09-28T23:20:03+5:30
रंगली रात्र.. : वन्समोअरच्या मागणीने नाट्यगृह डोक्यावर

बासरीच्या ‘अमर’ सुरांनी रत्नागिरीकरांना नादावले!
अरूण आडिवरेकर - रत्नागिरी --गाण्याचे शब्द जसेच्या तसे रसिकांच्या कानावर पोहोचवणारे बासरीचे सूर... त्या अवीट सुरांना मिळणारा वन्समोअर... बासरीच्या सुरांबरोबर जेंबोवर थिरकाणारी बोट... या साऱ्यात ‘प्रथम तुला वंदितो’पासून सुरू झालेले बासरी वादनाचे सूर ‘मोरया मोरया’पर्यंत कधी पोहोचले याचे भान कोणालाच राहिले नाही. बासरीच्या सुरांमध्ये शनिवारची रात्र रत्नागिरीकरांसाठी अविस्मरणीय ठरली. बासरीच्या सुरांनी इतके वेड लावले होते की हा कार्यक्रम संपूच नये, अशी भावना रसिक व्यक्त करत होते.
रत्नागिरीतील श्री रत्नागिरीचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे आयोजित केलेल्या ‘अमर बन्सी’ या कार्यक्रमातून रत्नागिरीकरांनी बासरीच्या सुरातून निघणारे गाण्याचे बोल ऐकत कार्यक्रमाचा आनंद लुटला. सावरकर नाट्यगृहात शनिवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अमर ओक यांच्या बासरी वादन कार्यक्रमात त्यांना प्रख्यात ढोलकीवादक नीलेश परब याने साथ दिली. त्याचबरोबर विक्रम भट याने तबला साथ, अभिजीत भदे याने आॅक्टोपॅड आणि केदार परांजपे याने किबोर्डची साथ दिली. या सर्वांबरोबरच मिलिंद कुलकर्णी यांनी केलेले निवेदनही सर्वांना भावले.
अमर ओक यांनी प्रथम अष्टविनायक चित्रपटातील ‘प्रथम तुला वंदितो’ हे गाणे सादर केले. त्यानंतर एकएक दर्जेदार गाण्यांचे बोल रत्नागिरीकरांच्या कानावर पडत होते. यामध्ये शांता शेळके यांचे ‘काय बाई सांगू’, गुरू ठाकूर यांचे ‘मन उधाण वाऱ्याचे’ गाणे सादर करण्यात आले. त्यानंतर सादर केलेल्या ‘तनहाई’ या गाण्याने सर्वांनाच ठेका धरायला लावला. या गाण्यांबरोबरच ‘खमाज’ या प्रकारातील गाणी सादर केली. शंकर एहसान लॉय यांच्या ‘मितवा’ या गाण्याच्या सुरांनी तर कार्यक्रमात अधिकच रंगत आणली.
‘तेरे मेरे मिलन की’, ‘आली ठुमकत’, ‘हसता हुआ नुरानी चेहरा’, ‘ओठो पे ऐसी बात’, ‘मधुबन मे राधिका’, ‘हम दोनो दो प्रेमी’, ‘मेहबुबा’ या गाण्यांच्या सुरांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. अमर ओक यांच्या बासरीतून बाहेर पडलेल्या ‘वाजले की बारा’ या गाण्याच्या सुरांनी तर नाट्यगृहात शिट्यांचा आवाज घुमला होता. त्याचबरोबर ‘वादळवाट’, ‘मालगुडी डेज’ या मालिकांच्या टायटल साँगने तर धमाल उडवून दिली. अमर ओक यांच्या बासरीतून इंग्रजी संगीताचीदेखील झलकही अनुभवता आली. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या कार्यक्रमाची सांगता अजय - अतुल यांच्या ‘मोरया मोरया’ या गीताने झाली.
यावेळी नीलेश परब याच्या बोटांची जादू साऱ्यांनीच अनुभवली. जेंबो या दक्षिण आफ्रिकन वाद्याबरोबरच ढोलकीवर फिरणारी बोट आणि त्यातून बाहेर पडणारे संगीत यांची जादू रत्नागिरीकरांनी अनुभवली.
कोवळं हसणं
ढोलकीपटू नीलेश परब याचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचे मनमुराद हसणं. वाद्य वाजवतानादेखील त्याचे ते हास्य पाहायला मिळते. निवेदकाने त्याची ओळख कोवळं हसणारा असे म्हणतातच त्याने आपल्या हास्याची झलक दाखविली.
रत्नागिरीचा गौरव
अमर ओक यांचा रत्नागिरीतील हा १३२वा प्रयोग होता. या प्रयोगांमध्ये कार्यक्रमाच्या शेवटापर्यंत कार्यक्रम डोक्यावर घेणारे प्रेक्षक तीनच ठिकाणी भेटल्याचे निवेदक मिलींद कुलकर्णी यांनी सांगितले. यामध्ये नाशिक, कोल्हापूर आणि रत्नागिरी असल्याचे त्यांनी सांगितले.
गाण्यात बाटलीचा वापर
संगीतकार पंचमदा यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक नवीन प्रयोग करून पाहिले. त्यांनी आपल्या गाण्यांमध्ये कधी पॉलिश पेपरचा तर कधी काचेच्या बाटलीचा वापर करून त्यातून संगीत दिले. त्याचेच दर्शन यावेळी कार्यक्रमातून अमर ओक आणि नीलेश परब यांनी घडविले.
अमर ओक यांच्याकडे ३८ इंचापासून ते ६ इंचापर्यंतच्या ३० बासरी आहेत. यामध्ये मंद्र सप्तक, मध्यम सप्तकाच्या बासरी आहेत. यावेळी त्यांनी बासरीचा इतिहास सांगताना हे नैसर्गिक वाद्य आहे. ती सरळ असून, पूर्णत: पोकळी असून, त्याला सहा छिद्र आहेत. वैराग्याचा अग्नि घेऊन षडरिपू बाहेर टाकले आहेत. ती स्वत: काहीच बोलत नाही, तिच्यामध्ये आपली फुंकर मारावी लागते. हे सारे गुण माणसाशी निगडीत असून, आपण सरळ असू, शरिराने पोकळ असू आणि षडरिपू बाहेर टाकले तर आपणही मानवी मुरली होऊ शकतो, असे अमर ओक यांनी सांगितले.