फोंडाघाट वनपालासह पाच कर्मचारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 15:42 IST2021-03-03T15:38:58+5:302021-03-03T15:42:27+5:30
forest department Sindhdurgnews-फोंडाघाटच्या वनक्षेत्रामध्ये औषधे गोळा करण्याकरिता गेलेल्या आदिवासी कातकरी महिलेसह पाच जणांना मारहाण झाली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन अटकेची कारवाई झालेले फोंडाघाट वनक्षेत्राचे वनपाल शशिकांत दत्ताराम साटम, वनरक्षक संदीपकुमार सदाशिव कुंभार, सुभाष दिलीप बडदे, मच्छिंद्र श्रीकृष्ण दराडे आणि वनमजूर सत्यवान सहदेव कुबल यांच्यावर अखेर सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक शहाजी नारनवर यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

फोंडाघाट वनपालासह पाच कर्मचारी निलंबित
कणकवली : फोंडाघाटच्या वनक्षेत्रामध्ये औषधे गोळा करण्याकरिता गेलेल्या आदिवासी कातकरी महिलेसह पाच जणांना मारहाण झाली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन अटकेची कारवाई झालेले फोंडाघाट वनक्षेत्राचे वनपाल शशिकांत दत्ताराम साटम, वनरक्षक संदीपकुमार सदाशिव कुंभार, सुभाष दिलीप बडदे, मच्छिंद्र श्रीकृष्ण दराडे आणि वनमजूर सत्यवान सहदेव कुबल यांच्यावर अखेर सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक शहाजी नारनवर यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
ही मारहाणीची घटना १८ फेब्रुवारी रोजी घडली होती. फोंडाघाट-गांगोवाडी माळ येथे राहणार्या कातकरी आदिवासी कुटुंबांपैकी सखू पवार हिच्यासह अन्य पाच जण फोंडाघाट जंगलात औषधी मुळे, झाडपाला गोळा करण्यासाठी गेले होते. यावेळी वनपाल आणि कर्मचार्यांनी त्यांना मारहाण केल्याची तक्रार कणकवली पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. सामाजिक संघटनांनी त्यासाठी आवाज उठविला होता.
त्यानुसार वनपाल व कर्मचाऱ्यांवर मारहाण आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. तर त्यांना जिल्हा न्यायालयाने एक दिवस पोलिस कोठडी दिली होती. कणकवलीच्या प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी सोळुंके यांनी या घटनेचा तपास करून संशयित कर्मचार्यांवर कारवाई केली होती.
हा प्रकार उघडीस आल्यानंतर अखंड लोकमंचचे अध्यक्ष नामानंद मोडक, शैलजा कदम, सत्यशोधक संघटनेचे अॅड. सुदीप कांबळे यांनी कणकवली पोलिस ठाण्यात कातकरी यांच्यासोबत जाऊन तक्रार दिली आणि नाहक मारहाण केल्याबद्दल अॅट्रॉसिटीची मागणी केली होती.
सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना एखाद्या गुन्ह्यात ४८ तास पोलिस कोठडी झाल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाते. त्यानुसार उपवनसंरक्षक नारनवर यांनी फोंडाघाट वनविभागाच्या कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई केली असल्याचे वनविभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.