मालवण : तालुक्यातील मसुरे देऊळवाडा ख्रिस्तवाडी टेंब येथील रहिवासी लुईस मारकू डिमॅलो यांच्या मालकीच्या नवीन घराला आग लागून ३५ ते ४० हजारांचे नुकसान झाले आहे. घरालगतच्या वीज खांबावरील वीजवाहिनीमधील शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.ही घटना मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास डिमॅलो कुटुंबीय मतदान करण्यासाठी लगतच्या मतदान केंद्रावर गेले असताना घडली. या आगीत घराच्या छपराचे पंचवीस फायबर पत्रे जळून खाक झाल्याने सुमारे २५ ते ३० हजार रुपयांचे नुकसान झाले. या नुकसानीचा रितसर पंचनामा करण्यात आला.
यावेळी देऊळवाडा तलाठी संदीप कांदळकर, पोलीस पाटील नेवेश फर्नांडिस, लुईस डिमॅलो, बस्त्याव लोबो, विलास बागवे, उपस्थित होते. या व्यतिरिक्त लगतच्या मांगरवजा शेडीतील जुने इमारती लाकूड सामान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. तसेच एक आंब्याचे झाड व नारळाचे झाड या आगीत जळाले. यात सुमारे ३५ ते ४० हजार रुपयांचे नुकसान झाले.