तळेरे : नांदगाव मोरयेवाडी येथील मनोहर आत्माराम बिडये व पूजा देवेंद्र बिडये यांच्या एकत्रित बंद घराला काल, सोमवारी (दि.१७) रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत पूर्ण घर आणि दुकान जळून भस्मसात झाले. सुमारे एक तासानंतर दाखल झालेल्या अग्निशामक बंबालाही ही आग आटोक्यात येताना कठीण जात होते. यामध्ये सुमारे २३ लाख ११ हजारांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात पुढे आले आहे.या आगीत पूजा देवेंद्र बिडये आणि मनोहर आत्माराम बिडये यांचे १९ लाख ७१ हजार, तर लवू राजाराम लाड यांच्या कोल्ड्रिंक्स व किराणा मालाचे ३ लाख ४० हजार असे एकत्रित २३ लाखांचे नुकसान झाले. मंगळवारी मुंबईवरून बिडये कुटुंब आल्यावर या सर्व घटनेतील नुकसानीचा पंचनामा करण्यात आला.मुंबई-गोवा महामार्गावर बिडये कुटुंबीयांच्या घराला आग लागली. बिडये कुुटुंबीय मुंबई येथे वास्तव्यास असतात. तर, सुनंदा बिडये या आजी येथे असतात. मात्र, तब्येत बरी नसल्याने काही दिवसांपूर्वी या आजी मुंबई येथे गेल्या होत्या. तर, याच घरात किराणा मालाचे लवू राजाराम लाड हे दुकान चालवितात. मात्र हे दुकानही एक महिन्यापासून बंद होते. सोमवारी रात्री ८:३० च्या सुमारास आग लागल्याचे लोकांच्या निदर्शनास आले. यानंतर स्थानिकांकडून अग्निशामक दलाला कळविण्यात आले. मात्र एक तासाने बंब दाखल झाला. तोपर्यंत आगीने संपूर्ण घर आपल्या विळख्यात घेऊन रौद्र रूप धारण केले. यामध्ये संपूर्ण घर जळून खाक झाले.
मदतीसाठी घटनास्थळी धावही घटना समजताच नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. याचवेळी घरात असलेल्या सिलिंडरचा मोठा स्फोट झाल्याने नागरिकही भयभीत झाले.शॉर्ट सर्किट झाल्याचा प्राथमिक अंदाजही आग नेमकी कशामुळे लागली याचे नेमके कारण कळले नसले, तरी शॉर्ट सर्किट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती कणकवली पोलीसांना नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलिस निरीक्षक भरत धुमाळ, हवालदार मिलिंद देसाई, चंद्रकांत झोरे, कॉन्स्टेबल, मकरंद माने आदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच नांदगाव मंडळ अधिकारी आत्मबोध जाधव यांनी ही रात्री भेट देत पाहणी केली आहे. या घटनेची माहिती मिळताच नांदगाव सरपंच भाई मोरजकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये, गावातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. आज, मंगळवारी तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
पुन्हा घेतला पेटबिडये यांच्या राहत्या घराला आग लागल्यानंतर जवळपास एक तासानंतर कणकवली येथील अग्निशमन बंब दाखल झाला. तोपर्यंत आगीने चौहोबाजूने रौद्र रूप धारण केले होते. बंबामधील पाणी संपल्यानंतर पुन्हा पाणी भरुन आणण्यात आले. ते ही पाणी संपल्यावर ११.१५ वाजता बंब कणकवलीला जायला गेला. तोपर्यंत आतील कपाटामधील कपडे व इतर वस्तू धुमसत असल्याने पुन्हा ११.३० आगीने पेट घेतला. मोरयेवाडी, बिडयेवाडी येथील स्थानिक ग्रामस्थांचे उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते.