सिंधुदुर्गात उद्योग उभारण्यासाठी २०० कोटींची आर्थिक तरतूद - प्रवीण दरेकर
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: October 21, 2022 17:47 IST2022-10-21T17:47:17+5:302022-10-21T17:47:44+5:30
सवलतीच्या दरात कर्ज वितरण करण्यात येणार

सिंधुदुर्गात उद्योग उभारण्यासाठी २०० कोटींची आर्थिक तरतूद - प्रवीण दरेकर
सिंधुदुर्ग: मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योग निर्माण होण्यासाठी २०० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे. यातून सवलतीच्या दरात कर्ज वितरण करण्यात येणार आहे. पर्यटन आणि स्थानिक उत्पदनाशी अनुसरून व्यवसाय उभारणीला प्राधान्य देण्यात येणार आहे. यातून रोजगार निर्मिती व्हावी. तसेच तरुणांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध व्हावा, यासाठी दोन्ही जिल्हा बँकेचा प्रयत्न आहे, अशी माहिती मुंबई जिल्हा बँक अध्यक्ष आ प्रवीण दरेकर यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या सिंधुदुर्गनगरी येथील प्रधान कार्यालयाला आमदार प्रवीण दरेकर यांनी आज सदिच्छा भेट दिली. यावेळी मुंबई बँक संचालक आमदार प्रसाद लाड, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार प्रमोद जठार, संचालक बाबा परब, संदीप सावंत, प्रभाकर सावंत, धोंडू चिंदरकर यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार दरेकर कुडाळ येथील भाजपच्या रॅलीसाठी शुक्रवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी आवर्जून जिल्हा बँकेला भेट दिली.