वायंगणी शेती नामशेषची भीती
By Admin | Updated: April 8, 2015 23:55 IST2015-04-08T22:59:32+5:302015-04-08T23:55:43+5:30
भातपेरणीत दिवसेंदिवस घट : वन्यप्राण्यांचा उपद्रव, पाणीटंचाईची समस्या

वायंगणी शेती नामशेषची भीती
सुरेश बागवे - कडावल -वायंगणी भातपेरणी क्षेत्राखाली दिवसेंदिवस घट होत आहे. सातत्याने होणारा वन्यप्राण्यांचा उपद्रव व पाणीटंचाईच्या समस्येमुळे शेतकरी याबाबत अनुत्सुकता दाखवत असून, भात उत्पादनाबरोबरच उत्कृष्ट प्रतीचे वैरणीचे गवत असा दुहेरी फायदा देणारी ही शेती पुढील काळात नामशेष होण्याची भीती व्यक्त होत आहे.
कडावल व हिर्लोक पंचक्रोशीत पूर्वीपासून वायंगणी शेती करण्यात येते. नारूर, कुसगाव, गिरगाव, हिर्लोक, किनळोस, रांगणा तुळसुली आदी गावांमध्ये विशेषत: वायंगणी भातपेरणीचे प्रमाण जास्त आहे. वायंगणी भातामुळे भात उत्पादनाबरोबरच गुरांसाठी उत्कृष्ट गवत असा दुहेरी फायदा मिळत असल्याने पूर्वी शेतकरी मोठ्या प्रमाणात भातपेरणी करत असत. शिवाय शेतात उन्हाळी हंगामातील वायंगणी भात पेरणी केल्यामुळे चरण्यासाठी मोकाट सोडण्यात येणाऱ्या गुरांना आपसूकच प्रतिबंध होतो.
त्यामुळे गुरांकडून होणारे शेतबंधाऱ्यांचे नुकसान टळते. पाणी टंचाईच्या समस्येबरोबरच वन्य प्राण्यांच्या उपद्रवाचे सावटही या शेतीवर कायम आहे. गवा रेडे व रानडुकरांकडून वायंगणी पिकाचे सतत मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यानेही शेतकरी आता वायंगणी भात पेरणीकडे दुर्लक्ष करू लागले आहेत.
परिणामी भात उत्पादन व वैरणीचे गवत असा दुहेरी फायदा देणारे ही पीक पुढील काळात नामशेष होण्याची भीती निर्माण झाली आहे. (वार्ताहर)
पाणीपुरवठ्याअभावी भात उत्पादनात घट
वायंगणी शेती शेतकऱ्यांसाठी किफायतशीर असली, तरी या शेतीला पाणीटंचाईची झळ आता बसू लागली आहे. वायंगणी पिकाला मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते.
मात्र, गेल्या काही वर्षांपासून
शेत जमिनीतील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होऊ
लागल्याने पाणी पुरवठ्याअभावी भात उत्पादनात घट येत
आहे.