...तर समुद्रात उपोषण
By Admin | Updated: October 16, 2015 00:13 IST2015-10-15T00:08:52+5:302015-10-16T00:13:05+5:30
मच्छिमारांचा प्रशासनाला इशारा : आचऱ्यातील महिलाही सहभागी होणार

...तर समुद्रात उपोषण
आचरा : मालवण पाठोपाठ आचरा येथील स्थानिक पारंपरिक मच्छिमारांनी मिनी पर्ससीन मासेमारी विरोधात भर समुद्रात ३० आॅक्टोबरला साखळी उपोषण छेडण्याचा निर्धार केला आहे. या उपोषणात स्थानिक महिलाही सहभागी होणार आहेत. याबाबतचे निवेदन आचरा पारंपरिक मच्छिमारांनी मालवण तहसीलदार व आचरा पोलीस ठाण्यास दिले आहे.निवेदन सादर करताना नारायण कुबल, वासुदेव कमळे, द्वारकानाथ पेडणेकर, विजय जोशी, शैलेश सारंग, प्रमोद चव्हाण, छोटू सावजी, दिलीप घारे, विठ्ठल सारंग, आदी उपस्थित होते. आचरा बंदरात सुरुवातीला २ ते ३ असणाऱ्या मिनी पर्ससीनधारकांची संख्या आता १५ वर पोहोचली आहे. मत्स्य विभागाच्या कारवाईला न जुमानता हे पर्ससीनधारक धुडगूस घालत आहेत. त्यामुळे गेली चार-पाच वर्षे आचरा पारंपरिक मच्छिमारांना मस्त्य दुष्काळास सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. कायदा ढाब्यावर बसवूनअनधिकृत मासेमारी करून पर्ससीनधारक लाखो रुपये कमवत आहेत.
वारंवार शासन व लोकप्रतिनिधी यांच्याकडे दाद मागूनही लक्ष देत नसल्याने बेकायदेशीर मिनी पर्ससीन मासेमारी बंद होईपर्यंतआचरा पारंपरिक मच्छिमार ३० आॅक्टोबरपासून खोल समुद्रात साखळी उपोषण छेडणार
असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. (वार्ताहर)