जिल्हा रुग्णालयात रिक्त पदे न भरल्यास उपोषण
By Admin | Updated: January 29, 2015 00:14 IST2015-01-28T22:04:53+5:302015-01-29T00:14:48+5:30
समविचारी मंच : नव्या पदांना मान्यता मिळूनही दुर्लक्ष, आरोग्य सेवेवर ताण

जिल्हा रुग्णालयात रिक्त पदे न भरल्यास उपोषण
रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर महत्त्वपूर्ण संवर्गाची पदे सन २००६पासून रिक्त आहेत. नव्या पदांना मान्यता मिळूनही गेली कित्येक वर्षे ती भरलेली नाहीत. जिल्हा शासकीय रुग्णालय हे गोरगरिबांचे आरोग्य मंदिर आहे. शासन स्तरावर या रुग्णालयाची हेळसांड खपवून घेतली जाणार नाही, असा परखड इशारा समविचार मंचतर्फे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रल्हाद देवकर यांना देण्यात आला.रिक्त पदांमुळे आरोग्यसेवेचा बोजवारा उडाला असून, याकामी त्वरित लक्ष न दिल्यास प्राणांतिक उपोषण करण्यात येईल, असा इशारा समविचारीतर्फे बाबा ढोल्ये, ज्येष्ठ नेते शरद नार्वेकर, जिल्हाध्यक्ष अशोक वाडेकर, जिल्हा सरचिटणीस छोटू खामकर, तालुकाध्यक्ष संजय नार्वेकर, शहर अध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांनी दिला. याबाबत बोलताना जिल्हा शल्यचिकित्सक देवकर यांनी रुग्णालयातील रिक्त पदे भरतीबाबत शासन स्तरावर योग्य तो पाठपुरावा सुरु आहे. याबाबत व्यक्त केलेल्या भावना आणि तोडगा काढण्याविषयी आवश्यक तो पत्रव्यवहार उपसंचालक, कोल्हापूर यांच्याशी करीत आहे, असे सांगून रिक्त पदांमुळे कर्तव्यपालनात चूक होत आहे. मनात असूनही रुग्णसेवेला न्याय देणे अवघड बनले आहे. ही वस्तुस्थिती मान्य करुन आपण आपल्या कार्यकालात अधिकाधिक सेवासुविधांचा प्रयत्न करीत आहोत, असे सांगितले. या चर्चेत विवेक गांधी, महेश शेलार, अनंत शेलार, अनिल कदम, रमेश गावडे, नीतेश कीर, मारुती पाडाळकर यांनी चर्चेत भाग घेतला. या चर्चेच्यावेळी रुग्णालय आवार स्वच्छता, वाहन तळांचा खाजगीरित्या होणारा वापर, अत्यावश्यक मशिनरी बंद होण्याचे प्रकार याबाबत चर्चा करण्यात आली.वेळोवेळी येणारे मंत्री आणि लोकप्रतिनिधी रिक्त पदे भरतीबाबत घोषणा करतात. प्रत्यक्षात त्याची कार्यवाही किती होते, असा सवाल छोटू खामकर, अशोक वाडेकर, शरद नार्वेकर यांनी मांडला. सर्वसामान्यांच्या निगडीत असलेली आरोग्यसेवा सुव्यवस्थित चालली पाहिजे. येत्या पंधरा दिवसात याबाबत योग्य तो निर्णय न झाल्यास संघटनेला बेमुदत उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असे त्यांनी सांगितले. या भूमिकेला दीपक कीर, संजय जाधव, रमेश गझने, मोहन घाणेकर, शरद पावसकर, विष्णू सनगरे आदींनी पाठिंबा दिला. यापूर्वी उपसंचालक आरोग्य सेवा हे पद रत्नागिरी येथे कार्यरत होते. ते का बंद करण्यात आले? नजीकच्या रायगड येथे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झालेले असताना रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयाचे काय झाले? याची उत्तरे समविचारी मंच शोधण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)