कणकवली: सांगवे, तेलंगवाडी येथील शेतकरी विनोद रामचंद्र मोर्ये (वय-५५) यांचा जमिनीवर तुटून पडलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. विनोद मोर्ये हे काल, बुधवारी संध्याकाळी आपली गुरे घरी न परतल्याने त्यांना शोधण्यासाठी गेले होते. रात्र झाली तरी ते घरी न परतल्यामुळे त्यांची पत्नी व वाडीतील ग्रामस्थांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु ते कुठेही आढळून आले नाहीत. ग्रामस्थांनी गुरुवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम राबविली असता विनोद मोर्ये हे सांगवे, तेलंगवाडी येथील दत्त्याचा उचवळा येथे तुटून पडलेल्या विजेच्या तारेनजीक मृतावस्थेत पडलेले आढळले. या घटनेची माहिती समजताच महावितरणचे अधिकारी तसेच कणकवली पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला. विनोद मोर्ये यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी व मुलगा, तीन विवाहित भाऊ असा परिवार आहे.
Sindhudurg: तुटलेल्या विजेच्या तारेच्या स्पर्शाने शेतकऱ्याचा मृत्यू
By सुधीर राणे | Updated: January 4, 2024 12:33 IST