‘माळीण’च्या माणुसकीची सय आणते डोळा पाणी हाती आता फक्त अल्बम
By Admin | Updated: August 7, 2014 00:14 IST2014-08-06T22:17:38+5:302014-08-07T00:14:43+5:30
‘माळीण’मध्ये निवृत्त झालेल्या देऊरुच्या गुरूजींनी दिला आठवणींना उजाळा

‘माळीण’च्या माणुसकीची सय आणते डोळा पाणी हाती आता फक्त अल्बम
वाठार स्टेशन : ज्या गावानं प्रेम दिलं, मायेचा आधार दिला, शाळेतील मुलांच्या उन्नतीसाठी नेहमीच मोलाची साथ दिली अन् दोन वर्षांच्या मुख्याध्यापक म्हणून केलेल्या सेवेचा ज्यांनी मनापासून गौरव करत निरोप दिला... अशा हसत्या-खेळत्या गावावर नैसर्गिक आपत्तीचा डोंगर कोसळावा अन् अख्ख्या गावानंच जगाचा निरोप घ्यावा, सारंच अनाकलनीय आणि मनाला चटका लावणारी घटना आहे. कोरेगाव तालुक्यातील देऊर गावचे विजय कुंभार यांनी ‘लोकमत’शी बोलताना बारा वर्षांपूर्वीच्या माळीण गावच्या आठवणींना साश्रू नयनांनी उजाळा दिला. कुंभार सांगत होते, चौदा वर्षांपूर्वी साताऱ्यातून पुणे जिल्ह्यातील दुर्गम डोंगराळ भागातील माळीण या गावी न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक म्हणून बदली झाली. नोकरीनिमित्त गावात पहिलं पाऊल ठेवलं. चारही बाजूंनी डोंगरकडा, दऱ्या, अरुंद रस्ते, घनदाट जंगल होतं. अशा गावात दोन वर्षे काढायची हा विचारच सुरुवातीला नकोसा वाटत होता. पण दोन वर्षांच्या कालावधीत येथील ग्रामस्थांच्या प्रेमानं आपलसं करून टाकलं. तेथील प्रत्येक घरातील माणसांशी जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं होतं. माझ्या सेवेचा कार्यकाळही याच गावात पूर्ण झाला. त्यावेळी ग्रामस्थांनी आदरपूर्वक निरोप दिला. गावावर कोसळलेल्या संकटातून किती वाचले, मला निरोप देणारे असतील का, या विचारानं मन कातरून जातं. निसर्गानं या गावाशी एवढ्या क्रूरतेनं वागायला नको होतं. या संकटानं अख्खं गाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकलं आहे. विजय कुंभार यांनी अल्बम रूपानं माळीण गावातील त्या दिवसांच्या आठवणी जपून ठेवल्या आहेत. या घटनेनंतर हा अल्बम पाहताना त्यांना अश्रू आवरता येत नव्हते. गुरुजी सांगत होते, ‘तीन खोल्यांची शाळा, कौलारू, पत्र्याची घरे, रस्त्यांची दुरवस्था अशी बिकट परिस्थिती होती. मात्र, गावात माणुसकीचा झरा खळखळून वाहत होता. ही दुर्घटना मनाला कायमचा चटका लावून गेली आहे. (वार्ताहर) गावकऱ्यांचे प्रेम अन् जिव्हाळा ‘मला अजूनही तो चित्तथरारक प्रसंग आठवतोय. गावाच्या बाजूने जंगल असल्यानं रात्री बाहेर पडणं शक्य नव्हतं. मी नुकतीच अध्यापनाला सुरुवात केलेली. एका रात्री माझ्या हाताला विंचू चावला. असह्य वेदना होत होत्या; पण दवाखान्यात जाण्याची सोय नव्हती. त्यावेळी एका ग्रामस्थाने बॅटरीच्या उजेडात दरीकडील जंगलात धाव घेतली. रात्रीच्या अंधारात चाचपडत त्यांनी झाडपाल्याचे औषध आणले आणि उपचार केले. तो क्षण आजही मला जसाच्या तसा आठवतो.’ माळीण गावाला जाणार असल्याचेही त्यांनी ‘लोकमतशी बोलताना सांगितले.