अनुभव कथनातून मद्यपाश सोडविणारा देवदूत
By Admin | Updated: October 23, 2014 22:51 IST2014-10-23T20:49:42+5:302014-10-23T22:51:42+5:30
अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस : यातनामय जीवनापासून दूर नेणारी अनामिक मद्यपींची चळवळ

अनुभव कथनातून मद्यपाश सोडविणारा देवदूत
‘अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस’ (एए) संस्था म्हणजे मद्यपींना मद्यपाशातून मुक्त करणारी संस्था. मात्र, मद्यपींच्या कुटुंबीयांना ती यातनामय जीवनापासून सोडविणारा जणू देवदूतच वाटतो. ‘अल्कोहोलिक अॅनॉनिमस’ म्हणजे अनामिक मद्यपी. अमेरिकेतील अॅक्रॉन शहरातील दोन अट्टल मद्यपींच्या गप्पांमधून दारूपासून दूर राहण्याच्या तंत्राचा शोध लागला आणि ‘अल्कोहोलिक अॅनॉनिमस’ संस्थेचा १९३५ साली जन्म झाला. या दोघांपैकी एक होता शेअरब्रोकर बिल विल्सन आणि दुसरा डॉ. बॉब स्मिथ. तेव्हापासून या यातनामय आयुष्यातून सुटका करून घेण्याची धडपड करणाऱ्या अनेक अनामिक सदस्यांची ही संस्था झाली. आपले अनुभव कथन करताना अनेक मद्यपींचे मद्यपाश दूर झाले आणि त्यांचे आयुष्य सुखकर झाले.
मद्यपींकडे समाज तुच्छतेने पाहतो. त्यांना सतत उपदेशाचे डोस पाजले जातात. समाजातून अशा व्यक्तींकडे कधीही समानतेच्या पातळीवरून पाहिले जात नाही. त्यामुळे अशा मद्यपींची बेफिकिरी आणि समाजाबद्दलचे तेढ कायम राहाते. मात्र, त्यांना समजून घेऊ शकतात ते ‘एए’ संघटनेचे कार्यकर्ते. एकमेकांच्या अनुभवातून जीवनाचे शहाणपण परत मिळविण्याचा प्रयत्न सुरू होतो. जुने मद्यमुक्त सदस्य नव्या सदस्यांना प्रेरणा देतात. आशावाद निर्माण करतात. आपल्याला कुणीतरी समजून घेतयं, ही भावना जगायला बळ देते. त्यामुळे ‘एए’ची विचारधारा त्या व्यक्तीला नम्र बनविते. वास्तवाचा स्वीकार करायला लावते. दारूमुळे आपलं शहाणपण चालत नाही, हे कळलं की, सुधारण्याचा मार्ग सुकर होतो आणि मग त्याचा लढा सुरू होतो, तो खऱ्या अर्थाने या पाशातून मुक्त होण्यासाठी. यासाठी मदत करतात, ते ‘एए’ चे सभासद.
आपल्याला यातून बाहेर काढू शकते ती उच्च शक्ती म्हणजे ‘एए’ ग्रुपची सामुहिकता. त्यातून आपल्या गुणदोषांवर काम करणे सुरू होते. आजपर्यंत केलेल्या चुका प्रांजळपणे स्वीकारून त्या परत घडू नयेत, यासाठी स्वत: बदलण्याच्या मानसिकतेतूनच यापुढे दारू न पिण्याचा निर्धार ठाम होऊ लागतो. मुळात मद्यपाश हा एक नकारात्मक आजार आहे. म्हणूनच त्याला सुधारू कोण शकतो, तर जे त्याला समजून घेऊ शकतात, ज्यांना मद्यपींबद्दल आस्था आहे, अशाच व्यक्ती. मद्यपींना या नरकमय यातनातून बाहेर काढण्याच्या तळमळीने रत्नागिरीत या व्यसनापासून मुक्त झालेल्या मंडळींनी २००४ साली ‘एए मुक्ती समूह’ या संस्थेची स्थापना केली. संस्थेची सदस्य संख्या होती केवळ तीन. आता ही संख्या सुमारे २० वर गेली आहे. आता या संस्थेला १० वर्षे पूर्ण होत आहेत. आठवड्यातून तीन वेळा या संस्थेच्या बैठका होतात. ज्यांना मद्यपाशातून मुक्ती हवी आहे किंवा त्या व्यक्तींचे कुटुंबीय या बैठकीला उपस्थित राहतात. सुरूवातीला संस्थेच्या बैठका शिर्के प्रशालेच्या एका खोलीत होत. आता दर शुक्रवारी सायंकाळी ७ ते ८.३० या वेळेत रत्नागिरीतील पटवर्धन प्रशालेत, तर दर बुधवार आणि रविवार देसाई हायस्कूलमध्ये होतात. सध्या या संस्थेतील सुमारे १० लोक कुठल्याही औषधोपचाराविना मद्यपाशातून मुक्त झाले आहेत. त्यांचे अनुभव कथन नव्यांचे आयुष्य सुधारायला मदत करते. सुरूवातीच्या काळात आलेल्या प्रत्येक नव्या सभासदासाठी सहा - सहा महिन्यांचा कालावधी जातो. जुन्यांना प्रचंड सहनशक्ती आणि परिश्रम घ्यावे लागतात. मात्र, जेव्हा त्यांची आयुष्य नव्याने उभी राहताना पाहिल्यावर त्यांनाही पुढे कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळते. यात महत्त्वाचे योगदान आहे ते मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कृष्णा पेवेकर यांचे. संस्था निर्माण झाल्यापासूनच डॉ. पेवेकरांचे सहकार्य या संस्थेला मिळाल्याबद्दलची कृतज्ञता सभासद व्यक्त करतात. आतापर्यंत १५० पेक्षा अधिक अनामिक मद्यपीना डॉ. पेवेकर यांनी मोफत समुपदेशन केले आहे.
दारूसाठी आयुष्य पणाला लावणाऱ्या व्यक्ती जेव्हा ‘एए मुक्ती समूह’मध्ये सहभागी होतात, तेव्हा त्यांच्यात पुन्हा नव्याने जगण्याची उर्मी प्राप्त होते.
- शोभना कांबळे
समाज घटकांचेही योगदान महत्त्वाचे ...
‘एए मुक्ती समूह’ ही संस्था कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय चालते. कुठल्याही स्वरूपाच्या देणग्या ही संघटना स्वीकारत नाही. ज्या सभा चालतात, त्यांचा खर्च मद्यपाशातून मुक्त झालेले सदस्यच करतात. या पाशातून मद्यपीला मुक्त करणे, ही चळवळ ही संस्था चालविते. अतिशय निरपेक्ष भावनेने हे कार्य गेली १० वर्षे सुरू आहे. अनेकांना या संस्थेने जगण्याचा नवा दृष्टीकोन दिला आहे, दारूमुळे अनेक विस्कटलेले संसार सावरले आहेत. यासाठी समाजाचे योगदानही तितकेच महत्वाचे आहे. आपल्या घरातील किेवा कुटुंबातील, शेजारी किंवा माहितीतील अशा व्यक्तींना मद्यपाशातून मुक्त करण्याची इच्ठा असल्यास त्यांनी संघटनेशी ९८९००२२९१ किंवा ९५२७५२०६९९ यावर संपर्क करावा. त्यांचे नाव गोपनीय राहील, असे आवाहन या कार्यकर्त्यांनी केले आहे.