Expenditure on training programs is questionable, a mess of millions of rupees | प्रशिक्षण कार्यक्रमांवर झालेला खर्च संशयास्पद, लाखो रुपयांचा घोळ

प्रशिक्षण कार्यक्रमांवर झालेला खर्च संशयास्पद, लाखो रुपयांचा घोळ

ठळक मुद्दे प्रशिक्षण कार्यक्रमांवर झालेला खर्च संशयास्पद, लाखो रुपयांचा घोळसुरमई जेवणाची बिले; पंचायत समिती स्तरावर झाले होते प्रशिक्षण

वैभववाडी : राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजनेंतर्गत प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी कार्यक्रमावर झालेला लाखो रुपये खर्च संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. जेवणासह लेखन साहित्य खरेदीत घोळ झाल्याचे माहिती अधिकारात स्पष्ट झाले आहे. या अवास्तव खर्चाबाबत पंचायत समितीचे पदाधिकारी मात्र, अनभिज्ञ आहेत. सर्व पीपीई खरेदीत गोलमाल करणाऱ्या त्या अधिकाऱ्यांनेच स्वत:चा हंडा भरल्याची चर्चा आहे.

पंचायत समिती पदाधिकारी, सरपंच आणि ग्रामसेवकांना प्रशिक्षण कार्यक्रमाचे १५ व १६ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमावर पंचायत समिती स्तरावरून १ लाख ३१ हजार ६१५ रुपये खर्च करण्यात आला आहे. यामध्ये जेवण व नाश्त्यावर तब्बल ४१ हजार ५२० रुपये, प्रोजेक्टर, बॅनर आणि इतर १६ हजार रुपये, साऊंड सिस्टीमवर ९ हजार रुपये, चहा व पाणी ९ हजार ६७५ रुपये, स्टेशनरी साहित्य ३९ हजार २२० रुपये आणि मार्गदर्शक तज्ज्ञांना मानधन म्हणून १४ हजार रुपये असे एकूण १ लाख ३१ हजार ६१५ रुपये खर्च दाखविण्यात आले आहेत.


या दोन दिवसीय प्रशिक्षणाला १३० प्रशिक्षणार्थी उपस्थित असल्याचे ह्यदाखविण्यातह्ण आले आहे. एका शेतकरी गटाला दोन दिवसांचे जेवण, नाश्ता आणि चहाचे २० हजार रुपये देण्यात आले. प्रत्यक्षात त्यांच्या नावे ४१ हजार ५२० रुपयांचा धनादेश देऊन त्यांच्याकडून इतर खर्चदेखील याच रकमेतून  दाखविण्यात आले आहेत.

खर्चासंदर्भात माहिती घेईन : बीडिओ

वैभववाडी पंचायत समितीचा कार्यभार आपण आताच स्वीकारला आहे. सध्या मी एका कामासाठी दुसरीकडे आहे. परंतु आल्यानंतर या खर्चासंदर्भात माहिती घेईन आणि योग्य तो निर्णय घेईन, असे पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी विद्या गमरे यांनी सांगितले.

खर्चाची खातरजमा करू : सभापती

प्रशिक्षणावर नेमका किती आणि कसा खर्च झाला याची माहिती घेऊन त्याची खातरजमा केली जाईल. जर चुकीच्या पद्धतीने खर्च झाला असेल तर त्यासंदर्भात नक्कीच ती बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्दशनास आणून दिली जाईल, असे सभापती अक्षता डाफळे यांनी यावेळी सांगितले.

कुणालाही पाठीशी घालणार नाही : रावराणे

सरपंच आणि ग्रामसेवक प्रशिक्षण व क्षमता बांधणी कार्यक्रमावर झालेल्या खर्चात घोळ असेल तर त्याबाबतीत शहानिशा करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे चौकशीची मागणी करण्यात येईल. कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे माजी सभापती तथा पंचायत समिती सदस्य लक्ष्मण रावराणे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Expenditure on training programs is questionable, a mess of millions of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.