हत्तींचे पुनर्वसन कर्नाटकात करणार : राऊत
By Admin | Updated: June 24, 2014 01:44 IST2014-06-24T01:18:15+5:302014-06-24T01:44:04+5:30
शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद

हत्तींचे पुनर्वसन कर्नाटकात करणार : राऊत
कुडाळ : जिल्ह्यातील हत्तींचे तिलारीमध्ये नाही तर कर्नाटक राज्यातील जंगलभागामध्ये पुनर्वसन करण्यात येणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी कुडाळात पत्रकारांशी बोलताना दिली.
खासदार विनायक राऊत कुडाळ तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद आयोजित केली होती. माणगाव खोऱ्यातील हत्तींच्या पुनर्वसनाबाबत वनराज्यमंत्री उदय सामंत यांच्याशी काही दिवसांपूर्वी आमदार राजन साळवी, सदानंद चव्हाण, राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली होती. त्यासंदर्भात त्यांनी हत्तींचे पुनर्वसन करण्याबाबत माहिती दिली.
येथील हत्ती हे तिलारी येथे न पाठविता कर्नाटक राज्यातील जंगल भागात पाठविण्यात येणार याकरिता तेथील शासनाने तत्वत: परवानगी दिली आहे. जुलै किंवा आॅगस्ट महिन्यात हत्ती हटाव मोहीम राबविली जाणार आहे, अशी माहिती राऊत यांनी दिली. हत्तींना कर्नाटकात नेण्यासाठी कर्नाटक सरकारने तत्वत: मान्यता दिली आहे. परंतु जर त्यांच्याकडून या गोष्टीला वेळ असेल, तर माझ्यासह राज्यमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, प्रमोद जठार, राजन क्षीरसागर व इतर काही लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ कर्नाटक शासनाची भेट घेणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.
येथील हत्तींचे दुसरीकडे पुनर्वसन करण्याबाबत राज्यमंत्री उदय सामंत यांच्याबरोबर चर्चा केली होती. यावेळी राज्यमंत्री सामंत यांनी कोल्हापूर पुनर्वसनाबाबत आदेश दिले असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. वानर प्रजातीतील सर्व प्रकारच्या प्राण्यांकडून नुकसान झाल्यास तसेच अन्य वन्य प्राण्यांकडून नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई तत्काळ देण्याचे आदेशही वनविभागाला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. गवा रेडे किंवा इतर प्राण्यांपासून शेतीची नुकसानी होऊ नये याकरिता सोलर कंपाऊंड शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत. गोवा राज्यात जाणाऱ्या जिल्ह्यातील वाहनांकडून प्रवेश कर घेऊ नये, याबाबत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. तिलारी प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावणार असून यासंदर्भात राज्यमंत्री सुनील तटकरे यांनी याबाबत चांगला प्रतिसाद दिला आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी अजूनही बैठक लावलेली नाही. प्रकल्पग्रस्तांचा वनटाईम सेटलमेंटचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाप्रमुख वैभव नाईक, कुडाळ तालुकासंपर्क प्रमुख सुरेश पाटील, गौरीशंकर खोत, उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)