राडासंस्कृतीमुळे प्रतिमा मलिन
By Admin | Updated: July 28, 2015 00:31 IST2015-07-27T22:53:04+5:302015-07-28T00:31:51+5:30
अतुल काळसेकर यांचा नीतेश राणेंना टोला

राडासंस्कृतीमुळे प्रतिमा मलिन
कणकवली : शांत, सुसंस्कृत म्हणून ओळखला जाणारा सिंधुदुर्ग जिल्हा राडासंस्कृतीसाठी प्रसिद्ध झाला. त्यामागे गेल्या पंधरा-वीस वर्षातील नारायण राणे आणि समर्थकांचे धुमशान कारणीभूत आहे. नारायण राणेंच्या सुडबुद्धीच्या राजकारणाने जिल्ह्याच्या प्रतिमेला तडा गेला आहे. युतीच्या मंत्र्यांमुळे जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाल्याची टीका करणाऱ्या आमदार नीतेश राणे यांनी हे लक्षात घ्यावे, असा टोला भाजपाचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी लावला आहे. येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष राजश्री धुमाळे, जिल्हा सरचिटणीस राजू राऊळ उपस्थित होते. शिक्षणमंत्री विनोद तावडे, आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत, पालकमंत्री दीपक केसरकर यांची राजकीय कारकीर्द स्वच्छ आहे. त्यांच्यामुळे जिल्ह्याची प्रतिमा मलिन होणे हे आमदारांचे वक्तव्य हास्यास्पद आहे. गेल्या पंधरा वर्षांत नारायण राणेंच्या कारकीर्दीत एकही केंद्रीय मंत्री जिल्ह्याच्या फिरकला नाही. राज्यातील मंत्री आले त्यांनी कोकण पॅकेजच्या नावाने फसवणूक केली. याऊलट युतीसरकारने वेगवेगळ्या माध्यमातून ५०० कोटींचा निधी आणला. या आधी जिल्हा नियोजनचा निधी फेबु्रवारीत वर्ग व्हायचा आणि मार्च अखेरीस तो ‘होलसेल’ खर्च व्हायचा. परंतु कोकणावर प्रेम करणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला १२५ कोटी वर्ग केले आहेत. जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदा असे घडले आहे.
नाथ पै, दंडवतेंचे नेतृत्व लाभलेल्या जिल्ह्याची प्रतिमा श्रीधर नाईक यांच्या हत्येने पहिल्यांदा डागाळली. ज्या नारायण राणेंच्या कारकिर्दीत जिल्हा अशांत झाला त्यांना नाथ पै, दंडवतेंच्या पंक्तित बसवून त्या महनीय व्यक्तींचा अपमान करू नये, असे काळसेकर म्हणाले.
विकासातील अधोगतीपेक्षा राजकीय दंगली, राड्यामुळे जिल्ह्याच्या प्रतिमेला तडा गेला आहे. सत्यविजय भिसे हत्या, रमेश गोवेकर अपहरण, मणचेकर खून, अंकुश राणे यांचा खून या घातपातांचा तपास अद्याप लागलेला नाही. बोलेरो प्रकरणात १ कोटी ५५ लाखांच्या बेनामी गाड्या कार्यकर्त्यांच्या नावावर घेतल्या जातात. त्याचा अद्यापपर्यंत हिशेब कॉँग्रेसला देता आलेला नाही. निवडणुका लागल्यानंतर कॉँग्रेसचा जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत धमकी प्रकरणात तुरूंगात जाणे, उमेश कोरगांवकर, पुष्पसेन सावंत यांच्यासारख्यांवर हल्ला या गोष्टींमुळे जिल्ह्याची प्रतिमा डागाळली जात नाही का? असा प्रश्न काळसेकर यांनी उपस्थित केला.
राणे कुटुंबीय व कार्यकर्त्यांच्या राडेबाजीला कंटाळून जिल्हावासीयांनी नारायण राणे यांच्याविरोधात कौल दिला आहे. त्यामुळे कोणामुळे जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाली आहे याचा इतिहास आमदार नीतेश राणे यांनी तपासून पाहावा, असे काळसेकर म्हणाले. (प्रतिनिधी)