रिक्तपदांमुळे रूग्णांना त्रास
By Admin | Updated: October 21, 2014 23:40 IST2014-10-21T21:42:05+5:302014-10-21T23:40:20+5:30
वेंगुर्ले रूग्णालयातील स्थिती : वैद्यकीय अधिकाऱ्यांची तारांबळ

रिक्तपदांमुळे रूग्णांना त्रास
प्रथमेश गुरव - वेंगुर्ले -येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांकरिता औषधांचा साठा मुबलक उपलब्ध असला तरीही कमी असलेल्या कर्मचारी वर्गाचा त्रास रुग्णांना सहन करावा लागत आहे. गरजेवेळी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यास खासगी रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागत आहे. वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांची संख्या वाढतीच असल्याने सर्व रुग्णांना योग्य सेवा देण्यास वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची तारांबळ उडत आहे. त्यामुळे रिक्त पदे भरण्याची मागणी वेंगुर्ले परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सध्याचे ग्रामीण रुग्णालय हे पूर्वी डिस्पेन्सरी या नावाने प्रचलित होते. तेव्हा त्याचा सर्व कार्यभार वेंगुर्ले नगर परिषदेकडे होता. त्यानंतर या रुग्णालयाची ‘ग्रामीण रुग्णालय’ असे नामकरण करण्यात आले. तेव्हापासून ओरोस येथील जिल्हा रुग्णालयाच्या अधिपत्याखाली हे रुग्णालय रुग्णांंना सेवा देत आहे. वेंगुर्ले येथील या ग्रामीण रुग्णालयामार्फत शासनाची कुटुंब कल्याण, रुग्ण कल्याण, पोलिओ मुक्त, हिवताप जनजागृती, एड्स्स जनजागृती असे उपक्रम प्रभावीपणे राबविले जातात. कुटुंब कल्याण, रुग्ण कल्याण अशा उपक्रमांना रुग्णांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच औषध साठाही मुबलक असल्याने येथील रुग्णांना औषधांसाठी बाहेर जावे लागत नाही.
परंतु येथील अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे व एकच वैद्यकीय अधिकारी एकच असल्याने पावसाळा किंवा अन्य साथींच्यावेळी रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढल्यास कार्यरत असलेल्या कर्मचारी वर्ग आणि मेडिकल आॅफिसरची तारांबळ उडत आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांना तत्काळ सेवा देणे शक्य होत आहे. कर्मचारी वर्ग वाढविल्यास रुग्णांना तत्काळ सेवा देणे शक्य होईल, असे मत येथील असिस्टंट सुपरिटेडंट डॉ. ए. ए. साखळकर यांनी सांगितले.
ग्रामीण रुग्णालयात ईसीजी, एक्स रे, रक्त, लघवी, तपासणी, चांगल्या प्रकारची औषधे व रोगाचे निदान व्यवस्थित होत असल्याने तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णालयाची जागा लहान असल्याने गंभीर आजारांवर आवश्यक असलेले उपचार येथे मिळणे कठीण होते. त्यामुळे गंभीर रुग्णांना ओरोस येथील जिल्हा रुग्णालय, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय किंवा गोवा- बांबोळी येथे पाठविण्यात येते. परिणामी उपचारास विलंब झाल्याने रुग्ण दगावण्याचीही उदाहरणे आहेत. अशा घटना थांबविण्यासाठी या ग्रामीण रुग्णालयाचा चांगल्या प्रकारे विस्तार करून तज्ज्ञ डॉक्टर व चांगल्या सुविधा उपलब्ध केल्यास पंचक्रोशीतील रुग्णांची बऱ्यापैकी सोय होणार आहे. वेंगुर्ले येथील ग्रामीण रुग्णालयात प्रसृतिगृह असल्याने सामान्य नागरिकांना कमी पैशात त्याचा फायदा होतो. दारिद्र्यरेषेखालील रुग्णांना रुग्णालयामार्फत त्यांना सर्व सुविधा पुरविल्या जातात.
एखाद्या रुग्णाची तपासणी झाल्यानंतर त्याची पुन्हा रुग्णालयात येण्याची क्षमता नसल्यास त्याला रुग्णालयातील व्यक्तीमार्फत किंवा रुग्णाच्या परिसरातील व्यक्तीमार्फत त्याच्या घरीच औषधे पुरविली जातात. टीबीसारख्या आजारांवरही यशस्वीरित्या उपचार होऊन रुग्ण बरा झाल्याची माहिती साखळकर यांनी दिली. रुग्णालयामार्फत मिळणाऱ्या चांगल्या सुविधांमुळे रुग्णांनी पुन्हा ग्रामीण रुग्णालय निवडले आहे. या रुग्णालयाला आवश्यक असणाऱ्या तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांऐवजी एकच अधिकारी कार्यरत असून आॅगस्टमध्ये तत्कालीन वैद्यकीय अधीक्षकांची बदली झाल्याने हे पद रिक्त आहे. रुग्ण तपासणी करणारे डॉ. रुपेश जाधव हे परीक्षेसाठी सुट्टीवर गेल्याने सध्या डॉ. अतुल मुळे रुग्ण तपासणी करीत आहेत. या रुग्णालयात एकूण २५ कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु साथीच्यावेळी रुग्णालयातील रुग्णसंख्या वाढल्यास रुग्णांना सेवा देणे त्यांना त्रासाचे होत आहे. लवकरात लवकर या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर, मेडिकल आॅफिसर, तसेच कर्मचारी वर्ग यांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.
रूग्णालयाचा विस्तार होणे आवश्यक
दाभोली, वायंगणी, परबवाडा, अणसूर, पाल आदी भागातील रुग्ण वेळप्रसंगी वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात धाव घेतात. मुळात रुग्णालयाची जागा अपुरी असल्याने आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांंना दाखल करणे गैरसोयीच होते. परिणामी सावंतवाडी, ओरोस, बांबोळी आदी ठिकाणी जावे लागते. याच रुग्णालयाचा विस्तार करून सर्व अद्ययावत सोयीसुविधा पुरविल्यास रुग्णांना बाहेर नेण्याची गरज पडणार नाही. वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालय शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. एसटी थांबा, बाजारपेठ जवळच असल्याने परगावातील रुग्णांना सोयीचे झाले आहे. तसेच या रुग्णालयाची रुग्णवाहिका व ओरोस येथून मिळालेली १०८ रुग्णवाहिका याच रुग्णालयाकडे असल्याने अतिगंभीर रुग्ण अधिक उपचारांसाठी तत्काळ परगावात नेणे सोयीचे बनले आहे.