शासनाच्या उदासीनतेमुळे आंबोली पर्यटन विकासाला खिळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 16:26 IST2019-01-16T16:25:05+5:302019-01-16T16:26:24+5:30
शासनाच्या उदासिनतेमुळे आंबोलीच्या पर्यटन विकासाला खीळ बसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, याबाबत ठोस पावले न उचलल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा येथे झालेल्या बैठकीत देण्यात आला आहे.

शासनाच्या उदासीनतेमुळे आंबोली पर्यटन विकासाला खिळ
आंबोली : शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे आंबोली पर्यटन स्थळाला धोका निर्माण झाला आहे. दरवर्षी विविध विकासकामांवर खर्च करत असलेल्या लाखो रुपयांच्या निधीचा चुराडा झाला आहे.
शासनाच्या उदासिनतेमुळे आंबोलीच्या पर्यटन विकासाला खीळ बसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, याबाबत ठोस पावले न उचलल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा येथे झालेल्या बैठकीत देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील प्रति महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेल्या आंबोलीमध्ये शासनाने विकासात्मक धोरणे राबवून आंबोली पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिध्द झाले. तेच पर्यटन क्षेत्र आज भकास होण्याची चिन्हे दिसत आहे.
या पर्यटन क्षेत्राचा विकास न होण्याचे कारण फक्त लोकप्रतिनिधी आणि शासन असल्याचे स्पष्ट होत आहे. पर्यटनासाठी आलेला लाखो रुपयांचा निधी मंजूर होऊनही आंबोली पर्यटन स्थळाची दुरवस्था कायम आहे. त्यामुळे हा निधी जातो तरी कोठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आंबोली पर्यटन झपाट्याने वाढ होण्याचे राहिले बाजूला, पण पर्यटन क्षेत्राच्या अधोगतीचा चाप लागलेला आहे. शासनाने चुकीच्या पध्दतीने खर्च केल्यामुळे आज आंबोलीत रस्त्यांची दयनीय अवस्था निर्माण झाली आहे.
सर्व पर्यटन पाँईटची दुरवस्था झाली असल्यामुळे आंबोलीत पर्यटकांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. भविष्यात शासनाने आंबोली पर्यटन क्षेत्राकडे पाट फिरवली तर येत्या एक ते दोन वर्षात येथील पर्यटन बंद होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.
आंबोली पर्यटन क्षेत्राला यापूर्वी विविध कामांवर लाखो रुपयांचा निधी खर्च होऊनही ते अपूर्ण अवस्थेत आहेत. वाहनतळाची गैरसोय असल्यामुळे पर्यटकांना आठ ते दहा किलोमीटर पायपीट करावी लागते. येथील पर्यटन स्थळांचा विकास करण्याची पालकमंत्र्यांनी आश्वासने दिली होती. मात्र त्यांनाही आश्वासनांचे विस्मरण झाले आहे.