कुडाळात रंगला ‘द्रौपदी वस्त्रहरण’

By Admin | Updated: June 30, 2014 00:09 IST2014-06-30T00:04:25+5:302014-06-30T00:09:58+5:30

मान्सून महोत्सव : दशावतारात ३५ साड्या परिधान; रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

'Draupadi khadharan' painted in Koodal | कुडाळात रंगला ‘द्रौपदी वस्त्रहरण’

कुडाळात रंगला ‘द्रौपदी वस्त्रहरण’


कुडाळ : येथील लाजरी क्रिकेट क्लब आयोजित मान्सून महोत्सवातील संयुक्त दशावतार नाट्य कंपनीनिर्मित ‘द्रौपदी वस्त्रहरण’ नाटक पाहण्यासाठी जिल्ह्यातील तसेच गोव्यातीलही रसिकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली. द्रौपदी वस्त्रहरणाच्यावेळी ३५ साड्या परिधान केल्याने साक्षात महाभारत चालू असल्याचा आभास होत होता. एक चांगले नाटक पाहण्याची संधी दिल्याने प्रेक्षकांनी आयोजकांचे आभार मानले.
कुडाळ येथील लाजरी क्रिकेट क्लबचे सर्वेसर्वा राजेश म्हाडेश्वर यांच्या संकल्पनेतून मान्सून महोत्सव आयोजन करण्याची संकल्पना गेल्यावर्षी आली होती. त्यानुसार त्यांनी गेल्यावर्षीही संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग व पुरुष विरुध्द महिला भजनी डबलबारीच्या सामन्याचे आयोजन केले होते. गेल्यावर्षीही या महोत्सवालाही प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केली होती.
यावर्षी या मान्सून महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी कुडाळचे माजी सरपंच अरविंद शिरसाट यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच स्रेहल पडते, उपसरपंच विनायक राणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, जिल्हा परिषद सदस्य रणजीत देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे, लाजरी क्रिकेट क्लबचे अध्यक्ष राजू पाटणकर, बंड्या सावंत, नीलेश तेंडुलकर, सदानंद कुडाळकर, राजेश महाडेश्वर, दशावतार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळा सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी रणजीत देसाई म्हणाले, या क्लबने गेल्यावर्षीपासून या महोत्सवात सातत्य ठेवून रसिक प्रेक्षकांना चांगल्या कलाकृतीचे दर्शन घडविले आहे. हे त्यांचे सातत्य टिकून रहावे. अभय शिरसाट यांनी, जिल्ह्यातील सर्व दशावतार नाट्यकंपनीतील निवडक दशावतार कलाकारांना एकत्र करून त्यांचे संयुक्तिक दशावतार नाटक प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून देणे हे लाजरी क्रिकेट क्लबचे काम कौतुकास्पद आहे, असे सांगितले.
विरत्व, शोक, शृंगार व
प्रासंगितकतेचे दर्शन
संयुक्त दशावतार कंपनीतील दशावतार कलाकारांनी हे नाटक सादर करताना आपल्या अभिनयातून विरत्व, शोक, शृंगार, प्रासंगिकता आणि नवरसांचे दर्शन घडवून कथानकाच्या आशयापासून शेवटपर्यंत एक चांगल्या कलाकृतीचा आस्वाद प्रेक्षकांना दिला. साक्षात महाभारतातील प्रसंगच सुरू असल्याचा आभास यावेळी निर्माण झाला होता.
उत्कृष्ट रंगभूषा, वेशभूषा
या नाटकातील पात्राने पात्राला साजेशी अशी उत्कृष्ट रंगभूषा, वेशभूषा केली होती. त्यामुळे प्रत्येक प्रसंग हा खरोखरचा वाटत होता. या मान्सून महोत्सवात सादर झालेली संयुक्त दशावतार नाट्य कंपनीच्या ‘द्रौपदी वस्त्रहरण’ नाटकावेळी जिल्ह्यातील तसेच गोव्यातील प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली होती. हॉल खचाखच भरून हॉल बाहेरच्या आवारातही हजारो प्रेक्षक उपस्थित होते.
शेवटी आयोजकांना बाहेरच्या प्रेक्षकांसाठी स्क्रिनवर नाटक दाखवावे लागले. हजारो प्रेक्षक असूनही अत्यंत चांगल्या पध्दतीने कार्यक्रम पार पडला. कोणत्याही प्रकारचा गदारोळ, भांडणे झाली नाहीत. आयोजकांचे चांगले नियोजन, बक्षिसांचा प्रेक्षकांकडून पाऊस पडला. आणि वाहने भरभरुन माणसे येतच होती.
या सर्व कार्यक्रमाचे आयोजन चांगले व्हावे यासाठी राजेश म्हाडेश्वर, राजू पाटकर, मयूर शिरसाट, विनायक राणे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट निवेदन राजा सामंत यांनी करून रसिकांची मने जिंकली. अशाप्रकारे संयुक्त दशावतार कलाकारांचे नाटक आयोजित करून दशावताराचे एक वेगळे दर्शन रसिक प्रेक्षकांना लाजरी क्रिकेट क्लबने घडविले. यामुळे दशावतार कलाकारांनाही नवसंजीवनी मिळाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Draupadi khadharan' painted in Koodal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.