मासेमारी नौका नाट्यमयरित्या बेपत्ता, अपहरण झाल्याचा मालकांना संशय; पोलिस तपास सुरू
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: November 30, 2022 13:34 IST2022-11-30T13:31:10+5:302022-11-30T13:34:30+5:30
तळाशील समुद्रात मासेमारी करत असताना अचानक 'अलसभा'ची सिग्नल यंत्रणा बंद होऊन ती गायब झाल्याच्या तक्रारीनुसार आचरा पोलीस ठाण्यात मासेमारी नौका व खलाशी बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

फोटो - अलसभा मासेमारी नौका नाट्यमयरित्या बेपत्ता झाली आहे.
आचरा (जि. सिंधुदुर्ग) - आचरा येथील मत्स्य उद्योजक मुजफ्फर उर्फ चावल बशीर मुजावर यांची 'अलसभा' (आयएनडी एमएच ०४ एमएम २९२१) ही मासेमारी नौका खलाशांसह अरबी समुद्रातून नाट्यमयरित्या बेपत्ता झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे. तळाशील समुद्रात मासेमारी करत असताना अचानक 'अलसभा'ची सिग्नल यंत्रणा बंद होऊन ती गायब झाल्याच्या तक्रारीनुसार आचरा पोलीस ठाण्यात मासेमारी नौका व खलाशी बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, नौका मालक मुजावर यांना त्यांच्या खलाशाच्या मोबाईलवरून 'व्हॉट्सअप' कॉलद्वारे हिंदी भाषिक अज्ञात व्यक्तीने संपर्क साधत १० लाखाची मागणी करत आपण कोस्ट गार्ड विभागातून बोलत असल्याची बतावणी केली. ज्याअर्थी नौका सोडविण्यासाठी पैशाची मागणी होत आहे, त्याअर्थी नौकेसह पाच खलाशांचे अपहरण केले असल्याचा दाट संशय आहे, असा अंदाज मुजावर यांनी व्यक्त करत आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील यांची भेट घेतली.
नौका मालक मुजावर यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार नौका बेपत्ता असल्याची नोंद घेण्यात आली आहे. याप्रकरणी सिंधुदुर्ग पोलीस, सागरी पोलीस तसेच कोस्ट गार्ड विभागाकडून तपास सुरू आहे. खलाशांकडे असलेल्या मोबाईलद्वारे लोकेशन तपासले जात आहे. आवश्यकता वाटल्यास हेलिकॉप्टरच्या साहाय्याने तपास होईल, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले.
सिग्नल दर्शवणारे दिवे झाले बंद
आचरा बंदरातून रविवारी दुपारी तळाशील ते देवबागच्या दिशेने अरबी समुद्रामध्ये हुक फिशिंगसाठी 'अलसभा' ही नौका गेली होती. या नौकेवर तांडेल करीअप्पा मर्नल, पपन्ना गोशी (दोन्ही रा. कोपाळ, कर्नाटक), तर कर्फुला मिन्झ, प्रमोद किसान, राजेश मिन्झ (तिघेही रा. उडीसा) हे पाच जण होते. रविवारी मध्यरात्री तळाशील ते देवबाग समुद्रात ही नौका मासेमारी करताना मुजावर यांच्या दुसऱ्या नौकेतील खलाशांना दिसून आली होती. मात्र त्यानंतर त्या नौकेवरील सिग्नल दर्शवणारे दिवे बंद झाले आणि नौका गायब झाली.