मृत पिल्लाला जिवंत करण्यासाठी डॉल्फिनची धडपड; मालवणनजीकच्या समुद्रातील हृदयद्रावक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 13:11 IST2025-01-04T13:09:01+5:302025-01-04T13:11:21+5:30
तळाशील समोरील समुद्रात एक प्रौढ डॉल्फिन एका डॉल्फिनच्या मृत पिल्लाला पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन आपल्या तोंडाच्या साहाय्याने ढकलत असल्याचे पर्यटकांना दिसून आले. डॉल्फिन हल्ला करत आहेत, असे वाटत होते. परंतु...

मृत पिल्लाला जिवंत करण्यासाठी डॉल्फिनची धडपड; मालवणनजीकच्या समुद्रातील हृदयद्रावक प्रकार
संदीप बोडवे
मालवण : आपल्या परिवारातील एक सदस्य जखमी होऊन मृत झाल्यानंतरसुद्धा त्याची काळजी घेत असल्याची घटना मालवण जवळील तळाशील समुद्रात पाहायला मिळाली. हा प्रकार हंपबॅक डॉल्फिन्सच्या बाबतीत घडला आहे. प्राण्यांमधील या प्रकाराला असे म्हटले जात असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. सस्तन प्राण्यांमधल्या या वागण्याचा उत्क्रांतीशी काय संबंध आहे, याचा अभ्यास व्हायला हवा, असेही ते म्हणाले.
तळाशील समोरील समुद्रात एक प्रौढ डॉल्फिन एका डॉल्फिनच्या मृत पिल्लाला पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन आपल्या तोंडाच्या साहाय्याने ढकलत असल्याचे पर्यटकांना दिसून आले. डॉल्फिन हल्ला करत आहेत, असे वाटत होते. परंतु, जवळ जाऊन पाहिले असता, एक प्रौढ डॉल्फिन मृत डॉल्फिनला पाण्याच्या पृष्ठभागावर ढकलत असल्याचे स्पष्ट झाले.
श्वास घेण्यासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर यावे लागते
कोकणाच्या समुद्रातील डॉल्फिनवर अभ्यास केलेले सागरी जीव संशोधक मिहीर सुळे यांच्याकडून याबाबत माहिती घेतली असता ते म्हणाले, डॉल्फिन हे सागरी सस्तन प्राणी आहेत. त्यांना श्वास घेण्यासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर यावे लागते. ते एखाद्या परिवाराप्रमाणे कळपाने राहतात.
या कळपातील एखाद्या सदस्याला इजा झाली, तर ते त्याची काळजी घेतात. पिल्लांच्या बाबतीत, तर अजून जास्त. तळाशील येथील घटनेत मृत डॉल्फिनचे पिल्लू हे कधी मेले हे इतर डॉल्फिनच्या लक्षात येत नाही किंवा त्यांना इतकं दुःख होत असेल की, त्यामुळे त्यांना त्या मृत पिल्लाला सोडवत नाही. मृत पिल्लू जिवंत आहे, असे समजून त्याला जिवंत ठेवण्यासाठी ते त्याला पाण्याच्या पृष्ठभागावर ढकलत आहेत.
अभ्यासातील पहिली घटना
- मिहीर सुळे म्हणाले, भारताच्या पश्चिम किनाऱ्यालगत सिंधुदुर्ग परिसरात २०२० मध्ये हंपबॅक डॉल्फिन्सचा अभ्यास करताना आम्हाला त्यांच्या वागणुकीचा एक काहीसा अजब प्रकार पाहायला मिळाला.
- दोन कळपांमध्ये एकेका पिल्लाचा मृत्यू झाला होता आणि दोन्ही काळपातल्या मोठ्यांनी आणि विशेषतः त्या पिल्लांच्या पालकांनी तो मृतदेह अनेक दिवस तरंगत ठेवून आपल्या बरोबर ढकलत नेला होता. पहिल्या घटनेमध्ये पिल्लाच्या उजव्या कुशीत धडक बसल्याचे दिसत होते.
कळपातल्या प्राण्याला, पिल्लाला इजा होते किंवा त्याचा मृत्यू होतो, तेव्हा कळपात एक भीतीचे वातावरण पसरते. आम्ही अशा दोन घटना जवळून पाहिल्या आहेत आणि त्याबद्दलची निरीक्षणे नोंदवली आहेत. सस्तन प्राण्यांमधल्या या वागण्याचा उत्क्रांतीशी काय संबंध आहे, याचा खोलवर अभ्यास व्हायला हवा, असे आम्हाला वाटते.
- मिहीर सुळे, डॉल्फिन अभ्यासक
अभ्यासातील दुसरी घटना
- दुसऱ्या घटनेत आम्ही डॉल्फिनच्या शवाचे विच्छेदन करून अभ्यासले असता, त्या पिल्लाच्या फुफ्फुसाला इजा झाल्याचे दिसून आले होते आणि त्यावर खपली सुद्धा चढली होती.
- यातून ही इजा काही दिवसांपूर्वी झाली असल्याचे समजले. या पिल्लाला श्वास घेता यावा, यासाठी त्याच्या कळपातील काही डॉल्फिन दर दोन-तीन मिनिटांनी त्याला पाण्याच्या पृष्ठभागावर ढकलत होते.