Sindhudurg: सावंतवाडीतील जिल्हा कारागृहाचे रूप पालटणार, तीन कोटीच्या खर्चास मान्यता

By अनंत खं.जाधव | Published: March 25, 2024 05:13 PM2024-03-25T17:13:33+5:302024-03-25T17:13:56+5:30

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विकास कामांचे उद्घाटन

District Collector approves the expenditure of three crores for the internal facilities of the district jail in Sawantwadi | Sindhudurg: सावंतवाडीतील जिल्हा कारागृहाचे रूप पालटणार, तीन कोटीच्या खर्चास मान्यता

Sindhudurg: सावंतवाडीतील जिल्हा कारागृहाचे रूप पालटणार, तीन कोटीच्या खर्चास मान्यता

सावंतवाडी : सावंतवाडीतील जिल्हा कारागृहाचे रूप पालटणार असून कारागृहातील अंतर्गत सुविधा निर्माण करण्यासाठी तीन कोटीच्या खर्चाला जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी मान्यता दिली. याबाबतची बैठक काल, रविवारी येथील कारागृहात पार पडली. दरम्यान विविध विकास कामांचे उद्घाटन जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडले.

यात कारागृहात प्रवेश करताना राजेशाही थाट असलेला दरवाजा, व्हिडिओ कॉलिंग, डॅशबोर्ड, व्ही सी युनिट्स या अत्याधुनिक सुविधांचा समावेश आहे. कारागृहातील बंदिवानही समाजाचाच एक भाग असल्याची जाणीव ठेवत शासनाच्या वतीने कारागृहात अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे कारागृह अधीक्षक संदीप एकशिंगे यांनी सांगितले.

यावेळी कारागृहाच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याहस्ते करण्यात आले तर व्हिडिओ कॉलिंग, डॅशबोर्ड व व्हीसी युनिट्सचे उद्घाटन जिल्हा न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश एच बी गायकवाड यांच्याहस्ते करण्यात आले. 

यावेळी ओरोस जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र २ च्या न्यायाधीश देशमुख, जिल्हा  विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव  कुरणे, सावंतवाडीचे प्रांताधिकारी हेमंत निकम, पोलीस उपअधीक्षक सध्या गावडे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता वैभव सगरे, कारागृह अधीक्षक संदीप एकशिंगे, तुरुंग अधिकारी संजय मयेकर, सुभेदार शेटे,  गवस, हवालदार सुर्वे, कर्मचारी सागर सपाटे, मोईज शेख  सोनाली आघाव, हनुमंत माने,  सिद्धी गावडे आदी कारागृह कर्मचारी उपस्थित होते.

 राज्य कारागृह व सुधार सेवाचे अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अभिताभ गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर, कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी जिल्हा कारागृहाच्या संपूर्ण लाकडी छताऐवजी लोखंडी पत्र्याच्या छताच्या नूतनीकरणसाठी शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली असून त्यासाठी दोन कोटी ४६ लाख ५६ हजाराचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 

यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी कारागृहाच्या मुख्य संरक्षण भिंतीची उंची वाढवणे कामासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ३९ लाख ८० हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली. तसेच कारागृहात संपूर्ण विद्युत संच मांडणी व लाईट फिटिंग, फॅन यासाठी १० लाख ४० हजार रुपये प्रशासकीय मान्यता दिली. सार्वजनिक बांधकाम खात्याबाबत मार्फत याकामाची तात्काळ पूर्तता करण्यात येणार आहे.

Web Title: District Collector approves the expenditure of three crores for the internal facilities of the district jail in Sawantwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.