जिल्हा बँक पंचवार्षिक निवडणूक : जिल्ह्यातील १ हजार १९ संस्थांचे ठराव सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 03:19 PM2021-02-25T15:19:15+5:302021-02-25T15:23:31+5:30

Banking Sector Sindhudurgnews- सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेअंतर्गत जिल्ह्यात १ हजार १७७ मतदार सभासद संस्था कार्यरत आहेत. या सर्व सहकारी संस्थांना मतदानाचा अधिकार आहे. यासाठी मतदान करणाऱ्या व्यक्तीची निवड सहकारी संस्थांना २२ फेब्रुवारीपर्यंत करून जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयात तसा ठराव द्यायची मुदत होती. या कालावधीत जिल्ह्यातील १ हजार १९ संस्थांनी आपले ठराव सादर केले आहेत.

District Bank Five Year Election: Resolutions of 1,019 institutions in the district submitted | जिल्हा बँक पंचवार्षिक निवडणूक : जिल्ह्यातील १ हजार १९ संस्थांचे ठराव सादर

जिल्हा बँक पंचवार्षिक निवडणूक : जिल्ह्यातील १ हजार १९ संस्थांचे ठराव सादर

Next
ठळक मुद्दे जिल्हा बँक पंचवार्षिक निवडणूक : जिल्ह्यातील १ हजार १९ संस्थांचे ठराव सादर १५८ संस्थांचे ठराव नसल्याने मतदानाचा अधिकार नाकारला

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेअंतर्गत जिल्ह्यात १ हजार १७७ मतदार सभासद संस्था कार्यरत आहेत. या सर्व सहकारी संस्थांना मतदानाचा अधिकार आहे. यासाठी मतदान करणाऱ्या व्यक्तीची निवड सहकारी संस्थांना २२ फेब्रुवारीपर्यंत करून जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयात तसा ठराव द्यायची मुदत होती. या कालावधीत जिल्ह्यातील १ हजार १९ संस्थांनी आपले ठराव सादर केले आहेत.

भविष्यात होऊ घातलेल्या जिल्हा बँक पंचवार्षिक निवडणुकीसाठी १ हजार १९ एवढे मतदार निश्चित झाले आहेत. तर, तब्बल १५८ संस्थांनी मतदानाचा अधिकार दिल्याचा ठराव सादर केलेला नसल्याने अप्रत्यक्षपणे या संस्थांनी मतदानाचा अधिकार नाकारला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची पंचवार्षिक मुदत मे २०२० मध्ये संपली आहे. मात्र, कोरोना प्रभावामुळे राज्य शासनाने जिल्हा बँकेला मुदतवाढ दिली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा बँक एकमेव अ वर्गात असलेली सहकारी संस्था आहे. गेले वर्षभर बँक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात राजकारण शिजत आहे.

सध्या या बँकेवर त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत निवडून आलेल्या संचालकांची सत्ता आहे. दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत शिवसेनेत गेले. त्यामुळे सध्या जिल्हा बँकेवर शिवसेनेचा अध्यक्ष असून सत्ता महाविकास आघाडीची आहे.

भविष्यात होणारी जिल्हा बँक निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार असल्याचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी जाहीर केले आहे. तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनीसुद्धा महाविकास आघाडीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जाण्याची चिन्हे आतातरी दिसत आहेत. तर, भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी जिल्हा बँक निवडणूक भाजप म्हणून न लढता सहकार विकास पॅनेल म्हणून लढणार असल्याचे जाहीर केले आहे. परिणामी, महाविकास आघाडी विरुद्ध भाजप पुरस्कृत सहकार विकास पॅनेल
अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात पावणेआठशे सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार असल्या, तरी त्यातील जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजण्याकडे जिल्ह्यातील सहकार विभागाचे लक्ष लागलेले आहे.

गेले वर्षभर शिवसेना व भाजप आपण निवडणुकीसाठी सज्ज असल्याच्या वल्गना करीत आहे. त्यामुळे ही निवडणूक आतापर्यंतच्या जिल्हा बँक इतिहासात चुरशीची होणार, हे निश्चित. काही इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

२२ फेब्रुवारीपर्यंत आणखी २९९ संस्थांचे ठराव

जिल्ह्यात १ हजार १७७ मतदार संस्था आहेत. या संस्थांना एक संचालक, सभासद याला मतदान करण्याचा अधिकार द्यावा लागतो. राज्य शासनाने निवडणूक घेण्यावर लावलेले निर्बंध उठविण्यापूर्वी ७२० संस्थांनी आपला ठराव दिला
होता. ४५७ संस्थांनी ठराव दिला नव्हता. त्यासाठी २२ फेब्रुवारीपर्यंत मुदत होती. या कालावधीत आणखी २९९ संस्थांनी ठराव दिला आहे. तर, १५८ संस्थांनी ठराव दिलेला नाही. परिणामी, जिल्हा बँक निवडणुकीसाठी १ हजार १९ एवढे मतदार निश्चित झाले आहेत.

Web Title: District Bank Five Year Election: Resolutions of 1,019 institutions in the district submitted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.