शेतकऱ्यांना गोड्या पाण्यातील मत्स्यबीजांचे वितरण

By Admin | Updated: October 5, 2014 23:10 IST2014-10-05T21:37:17+5:302014-10-05T23:10:05+5:30

मुळदे येथील उद्यानविद्या महाविद्यालयाचा उपक्रम

Distribution of freshwater fish seeds to farmers | शेतकऱ्यांना गोड्या पाण्यातील मत्स्यबीजांचे वितरण

शेतकऱ्यांना गोड्या पाण्यातील मत्स्यबीजांचे वितरण

कुडाळ : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथील गोड्या पाण्यातील मत्स्य संशोधन व संवर्धन प्रकल्पांतर्गत निर्माण करण्यात येणाऱ्या गोड्यापाण्यातील विविध प्रजातींच्या मत्स्यबीजाचे वितरण विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. किसन लवांडे यांच्या हस्ते जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करण्यात आले.
सन २०१३ यावर्षी मत्स्य प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील पहिल्या मत्स्यबीज केंद्राची निर्मिती मुळदे येथे करण्यात आली. या बीज केंद्राचे कार्यान्विकरण सन २०१४ च्या पावसाळी हंगामात करण्यात आले.
या बिजोत्पादन केंद्रामधून भारतीय प्रमुख कार्प, सायाप्रिनस कार्प पंगेशिअस जातीच्या मासळीच्या बिजाची निर्मिती मोठ्या प्रमाणात करून ते बीज जिल्ह्यातील व आवश्यकतेनुसार इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुरविण्याचा उपक्रम विद्यापीठाने हाती घेतलेला आहे. या अंतर्गत यावर्षी सुमारे सव्वा चार लाख मत्स्य बीज तयार करून त्याचे वितरण जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील शेतकऱ्यांना करण्यात आलेले आहे.
याशिवाय विविध जातीच्या रंगीत मासळीच्या बिजाची निर्मिती तसेच स्थानिक संवर्धनयोग्य जातीच्या मासळीच्या बिजाची निर्मिती या ठिकाणी करण्यात येत असून हे बीज मत्स्यशेती करणाऱ्यांना कमीत कमी दरात विद्यापीठाकडून उपलब्ध करून दिले जात आहे.
यावेळी सहयोगी अधिष्ठाता डॉ. पराग हळदणकर, मत्स्य प्रकल्पाचे प्रमुख डॉ. नितीन सावंत, महेंद्र गवाणकर, डॉ. उदय आपटे, राजेश मुळये व संशोधन प्रकल्पाचे अधिकारी, कर्मचारी, जिल्हाभरातून आलेले शेतकरी व महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन नवीन राठोड यांनी केले. (प्रतिनिधी)

कुलगुरूंनी विद्यार्थ्यांशी साधला सुसंवाद
या उपक्रमामुळे जिल्ह्यात मत्स्यशेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. सध्या शोभिवंत मत्स्यपालन तसेच खाण्यास योग्य अशा माशांचे संवर्धन सुमारे ७५ ते ८० शेतकरी या जिल्ह्यात करीत असून शेतकऱ्यांना वर्षभर पूरक उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध झालेला आहे. या भेटीच्यावेळी कुलगुरूंनी मुळदे प्रक्षेत्रावर चाललेल्या विविध उपक्रमांची पाहणी केली व विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला.

Web Title: Distribution of freshwater fish seeds to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.