Disputes between the former mayor and the deputy mayor are at hand | माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्यातील वाद हातघाईवर, दोडामार्गमधील प्रकार

दोडामार्ग येथील मासळी बाजारात भाजप कार्यकर्त्यांमध्ये आपापसात वाद उफाळून आला.

ठळक मुद्देमाजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्यातील वाद हातघाईवर, दोडामार्गमधील प्रकार : भाजपाअंतर्गत कुरघोडीचे राजकारण, अनेक दिवसांपासून धुमसत होता वाद

दोडामार्ग : गेल्या अनेक दिवसांपासून कसई-दोडामार्ग नगरपंचायतीमध्ये माजी नगराध्यक्ष संतोष नानचे व उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्यात सुरू असलेला वाद अखेर रविवारी मासळी विक्रीच्या वादावरून चव्हाट्यावर आला. दोघांमध्येही चांगलीच शाब्दिक बाचाबाची झाली. अखेर हा वाद हातघाईवर आला असताना दोघांनाही भाजपाच्या इतर पदाधिकाऱ्यांनी बाजूला घेतल्याने त्यावर पडदा पडला. मात्र, भाजपाच्या दोन पदाधिकाऱ्यांतील या चव्हाट्यावर आलेल्या वादळामुळे दोडामार्ग शहर भाजपात काहीच आलबेल नसल्याचे समोर आले.

कसई-दोडामार्ग नगर पंचायतीमध्ये भाजपाच्या नगरसेवकांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अंतर्गत वाद धुमसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ बंद करण्याचा निर्णय असो अथवा इतर विकासकामे. या सर्वात भाजपाच्या नगरसेवकांतर्गत धुसफूस पहायला मिळाली.

माजी नगराध्यक्ष संतोष नानचे आणि सध्याचे उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्यात या ना त्या कारणावरून नेहमीत कुरघोडी सुरू असते. त्यामुळे दोडामार्ग शहर भाजपातही अंतर्गत गटबाजी असल्याचे अनेकदा पुढे आले आहे.

मध्यंतरीच्या काळात भाजपाच्या वरिष्ठांकडून मनोमिलन झाल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, तरीदेखील हा वाद उफाळून येत आहे. रविवारी तर हा वाद चव्हाट्यावर आला. त्याला निमित्त ठरले ते मासळी बाजार बंद असताना एक मासे विक्रेत्या महिला विक्री करीत असल्याचे. गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठवडा बाजार बंद ठेवण्यात आला आहे. तर मासे विक्री व भाजीविक्री रविवारची बंद ठेवण्यात येते.

मात्र, रविवारी मासळीबाजार व भाजी मंडई बंद असताना एक मासळी विक्रेती महिला मासे विक्री करताना आढळली. त्यामुळे इतर मासे विक्रेत्यांवर अन्याय का? याचा जाब विचारण्यासाठी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष नानचे, माजी सरपंच पांडुरंग बोर्डेकर, बाळा कोरगावकर, प्रकाश काळबेकर आदी भाजपा पदाधिकारी गेले.

मुख्याधिकारी शिवराज गायकवाडदेखील यावेळी आले. याच दरम्यान, मासे विक्री करणाऱ्या महिलेसोबत चर्चा सुरू असताना उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण त्याठिकाणी आले. यावेळी योगेश महाले, सुमित म्हाडगुत, रोहन चव्हाण, समीर रेडकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष लवू मिरकर आदी उपस्थित होते.

यावेळी नानचे यांनी कोणीही येऊन तुम्हांला मासे विक्री करा असे सांगत असेल तर ते करू नका. नगरपंचायत प्रशासन जे सांगेल ते करा असे सांगितले. याच मुद्यावरून चव्हाण व नानचे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी नानचे यांच्यावर चव्हाण यांनी आरोप केले.
 

Web Title: Disputes between the former mayor and the deputy mayor are at hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.