डेंग्यू साथरोगाची झळ जिल्ह्याला
By Admin | Updated: November 9, 2014 23:28 IST2014-11-09T22:20:21+5:302014-11-09T23:28:04+5:30
आरोग्य विभाग : योग्य काळजी घेतल्यास मात करणे शक्य

डेंग्यू साथरोगाची झळ जिल्ह्याला
सिंधुदुर्गनगरी : राज्यात डेंग्यूने थैमान मांडले असून कित्येकांचे बळीही घेतले आहेत. या साथरोगाची झळ सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही काही प्रमाणात बसत आहे. डेंग्यू हा नेमका कसा होतो? त्याची लक्षणे कोणती? तसेच या डेंग्यूचा नायनाट कसा करता येईल याबाबतची माहिती देण्यात आली असून योग्य काळजी घेतल्यास डेंग्यूवर मात करू शकतो, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
डेंग्यूचा उपद्रव रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील का या संदर्भात जिल्हा आरोग्य विभागाचे साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. नामदेव सोडल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, डेंग्यू ताप (हाडमोडी ताप) हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंग्यू विषाणूमुळे होतो. एडीस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्याद्वारे तो प्रसारीत केला जातो. हा एक तीव्र फ्लूसारखा आजार आहे. संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर पाच-सहा दिवसानंतर मनुष्याला हा रोग होतो. हा रोग (आजार) दोन प्रकारे होतो. डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप. डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप हा एक अधिक तीव्र स्वरूपाचा आजार असून त्यामुळे मृत्यू ओढवू शकतो. आजारी माणसाच्या रक्तातील डेंग्यू विषाणू एडीस इजिप्ती जातीच्या डासांच्या मादीमार्फत दुसऱ्या निरोगी व्यक्तीस संक्रमित केले जातात. हे डास साधारणपणे समुद्रसपाटीपासून १००० मीटरपर्यंतच्या भागात जिवंत राहतात. याच्या साथी वेगाने पसरू शकतात. एडीस इजिप्ती हा एक लहान काळा डास असून त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात आणि त्याचा आकार अंदाजे ५ मिलीमीटर असतो. हा आपल्या शरीरात विषाणू तयार करायला ७ ते ८ दिवस घेतो आणि नंतर रोगाचा प्रसार करतो. साधारणपणे हे डास दिवसाचा चावा घेतात अशी माहिती डॉ. सोडल यांनी दिली.
डेंग्यू ताप
लहान मुलांमध्ये मुख्यत: सौम्य स्वरूपाचा ताप येतो. मोठ्या माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप सोबत डोके, डोळे दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, अंगावर लाल रंगाचा चट्टा येवू शकतो. अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते. म्हणून याला हाडे मोडणारा ताप असेही म्हणतात.
डेंग्यू अतिगंभीर आजार
ही डेंग्यू रक्तस्त्राव तापाचीच पुढची अवस्था असून काही टक्के लोकांमध्येही दिसून येते. यात रुग्णाचे अस्वस्थ होेणे, थंड पडणे, नाडी मंदावणे, रक्तदाब कमी होणे आणि शेवटी मृत्यू ओढवू शकतो.
प्रतिबंध
डासांना आळा घालणे हा एकमेव उपाय. रोगाला पसरवण्यापासून थांबू शकतो. घराच्या आजूबाजूला पाणी साठू न देणे, वेळच्यावेळी साठलेले पाणी रिकामे करणे, डासांना प्रतिबंध घालू शकतात.
औषधोपचार
ताप आल्यानंतर खूप वाट पाहू नये. तत्काळ डॉक्टरजवळ जाणे, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये म्हणून जलपेयाचा भरपूर उपयोग करावा. ताप उतरत नसल्यास किंवा वरील लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेऊन रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात भरती करावे अशी माहिती डॉ. नामदेव सोडल यांनी दिली. (प्रतिनिधी)
डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप
हा गंभीर स्वरूपाचा प्रकार असून यात तापाबरोबरच बाह्य रक्तस्त्राव, चट्टे उठणे, हिरड्यांमधून रक्तस्त्राव तसेच अंतर्गत रक्तस्त्राव, प्लेटलेटची संख्या कमी होणे आदी प्रकार होऊ शकतात. तसेच छातीत, पोटामध्ये पाणी जमा होऊ शकते. डेंग्यू तापाप्रमाणेच लक्षणे तीव्र, सतत पोटदुखी, त्वचा फिकट, थंड किंवा चिकट होणे, नाक, तोंड आणि हिरड्यांमधून रक्त येणे आणि त्वचेवर पुरळ उठणे आदी लक्षणे आढळून येतात.