डेंग्यू सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक वस्तूंना मागणी
By Admin | Updated: November 11, 2014 23:17 IST2014-11-11T22:36:04+5:302014-11-11T23:17:49+5:30
रत्नागिरी जिल्हा : नागरिकांमध्ये होतेय जागरूकता

डेंग्यू सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक वस्तूंना मागणी
रत्नागिरी : संपूर्ण जिल्ह्यात नव्हे; तर अवघ्या राज्यात डेंग्यूने थैमान घातले आहे. शासकीय तसेच खासगी रूग्णालयात डेंग्यूचे रूग्ण उपचार घेत आहेत. डेंग्यूची भीती सर्वसामान्यांमध्ये पसरली आहे. डासांमुळे डेंग्यूचा प्रसार होत असल्यामुळे नागरिकांकडून खबरदारी म्हणून डास प्रतिबंधात्मक वस्तूंना मागणी होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली ‘स्वच्छ व सुंंदर भारत’ संकल्पना राबवण्यासाठी शासकीय, निमशासकीय कार्यालये सरसावली आहेत. त्याच अनुषंगाने डेंग्यूपासून बचावासाठी खबरदारी म्हणून नागरिकदेखील आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी खबरदारी घेत आहेत. नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थादेखील सफाईबरोबर गवतकटाई करीत आहेत. ग्रामीण भागात तर डास प्रतिबंध म्हणून चक्क नारळाची सोडणे, गवऱ्या यांचा धूर करण्यात येत आहे.
डास चाऊ नये, यासाठी नागरिकांकडून ओडोमाससारख्या प्रसाधनांचा वापर वाढू लागला आहे. गुडनाईट अॅडव्हान्सला मागणी वाढू लागली आहे. शिवाय क्वाईलसचाही खप वाढला आहे. मच्छरदाणी हा डासापासून संरक्षणासाठी प्रभावी उपाय पारंपरिक आहे. मात्र, छोट्या घरात मच्छरदाणी लावणे शक्य होत नसल्यामुळे त्याऐवजी ओडोमाससारखी प्रसाधने किंवा गुडनाईटचा वापर वाढला आहे. बालकांसाठी तर आवर्जून मच्छरदाणीचा वापर करण्यात येत आहे. डेंग्यूमुळे शरीरातील प्लेटलेस कमी होतात. प्लेटलेटस वाढण्यासाठी काळा खजूर तसेच अंजीरचा वापर उपयुक्त ठरत असल्याने काळा खजूर व सुक्या अंजीरचा खपही वाढलेला दिसून येत आहे. पपईमुळेदेखील प्लेटलेटस् वाढत असल्यामुळे पपईलाही विशेष मागणी दिसून येत आहे. डेंग्यूची फैलावणारी साथ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करताना नागरिकांचे प्रबोधनही करण्यात येत आहे. वास्तविक नोव्हेंबरमध्ये हिवाळा असतो. परंतु यावर्षी थंडी गायब असल्यामुळे उकाडा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. पाणीसाठा असणाऱ्या ठिकाणी डेंग्यूची पैदास होत असल्याने नागरिक जागरूक होत आहेत. (प्रतिनिधी)