‘सीईटीपी’वर कारवाईची मागणी

By Admin | Updated: December 30, 2014 23:34 IST2014-12-30T21:28:38+5:302014-12-30T23:34:16+5:30

हनीफ परकार : मासेवारीवर शोककळा, ग्रामस्थ संतापले; आता माघार नाही

Demand for action on 'CETP' | ‘सीईटीपी’वर कारवाईची मागणी

‘सीईटीपी’वर कारवाईची मागणी

खेड : तालुक्यातील लोटे येथील सीईटीपीमधून सोडण्यात येणारे सांडपाणी न्यायालयाच्या आदेशानंतरही सोडलेच जात आहे. या पाण्यामुळे दाभोळ खाडी मोठ्या प्रमाणावर दूषित होत असून, मासे मरण्याचे प्रमाण वाढले आहे. याप्रकरणी लोटे सीईटीपीवर कारवाई करण्याची मागणी प्रदूषणविरोधी लढा देणारे हनिफ शरीफ परकार यांनी केली आहे.
खेड येथील तहसीलदार आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे याबाबत वारंवार निवेदने देऊनही याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात येत आहे. मच्छिमारी व्यवसायावर जगणाऱ्या येथील लोकांवर दूषित पाण्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आता माघार न घेता सीईटीपीवर कारवाई करण्याबाबत आपण पावले उचलणार असल्याचे परकार यांनी सांगितले आहे.
लोेटे औद्यौगिक वसाहतीमधील सर्व रासायनिक कंपन्या आपले सांडपाणी सीईटीपी या सांडपाणी यंत्रणेद्वारे सोडीत आहेत. १९९७ पासून आजतागायत हे सांडपाणी दाभोळ खाडीत सोडणे सुरूच आहे. या दूषित सांडपाण्यामुळे जगबुडी, वाशिष्ठी, दाभोळ खाड्या दूषित होत आहेत. सीईटीपीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन १९९७पासून पर्यावरणासह येथील तहसीलदारांना तीन वेळा देण्यात आले. मात्र, कुणीही लक्ष दिले नाही. याच दाभोळ खाडीत मासेमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. मात्र, दूषित पाण्यामुळे मासे मरून ते खाडीच्या किनाऱ्यावर पसरत आहेत. त्यामुळे येथील मच्छिमार संकटात सापडला आहे. याप्रकरणी न्यायालयामध्ये जनहीत याचिका दाखल करण्यात आली असून, न्यायालयाने दिलेला बंदी आदेश मोडून दाभोळ खाडीत पुन्हा मासे मरून पडत आहेत. विषारी पाण्यामुळे माशांची मरतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. न्यायालयाचा अनेक वेळा अवमान करणाऱ्या लोटे येथील सीईटीपीवर कारवाई करावी, अशी मागणी हनिफ परकार यांनी केली आहे.
कोट्यवधी रूपये खर्च करून लोटे औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी, रासायनिक कारखान्यामधून सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून ते सोडले जात आहे की नाही, यावर लक्ष ठेवणाऱ्या संबंधीत यंत्रणेचे अनेक वर्षांपासून दुर्लक्ष होत आहे, असा खाडीपट्ट्यातील सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप आहे. येथील प्रदूषण न थांबवता उद्दाम अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना वाचवण्याचा प्रकार वाढायला लागला. खेड, चिपळूण, दाभोळ खाडीपट्ट्यातील बांधवांना अनेक वर्षे माशांच्या संकटाला तोंड द्यावे लागत असल्याने या यंत्रणेबाबत तक्रारी वाढू लागल्या आहेत. (प्रतिनिधी)


प्रदूषणाने खेड तालुक्यातील पारंपरिक व्यवसाय ठप्प होण्याची भीती.
कोकणात प्रदूषणावर ठोस उपाय योजना नसल्यानेच खाडीपट्ट्यात असंतोष.
आंदोलनांनंतर केली जाते तात्पुरती कारवाई.
नद्या झाल्या दूषित, नागरिकांचे हाल कोण खातो. प्रदूषण नियंत्रण मंडळ करते काय ?


लोटे औद्योगिक क्षेत्रात असलेल्या रासायनिक कारखानदारांच्या संघटनांनीही यात लक्ष घालून जनतेला न्याय द्यायला हवा, अशी मागणी केली जात आहे. मात्र, सीईटीपीची जबाबदारी या सर्वात महत्त्वाची आहे.


यावर उपाय
काय?
गेले अनेक महिने आम्ही येथील प्रदूषणावर ठाम आहोत. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा सामूहिक सांडपाणी प्रक्रिया व्यवस्थापन केंद्राच्या कारभारावर वारंवार संताप व्यक्त करीत आहोत.

Web Title: Demand for action on 'CETP'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.